Saturday, October 25, 2025
Happy Diwali

यंदाच्या छठ पुजेत विरोधही होणार मावळ, काय आहे कारण...

यंदाच्या छठ पुजेत विरोधही होणार मावळ, काय आहे कारण...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी यंदा छठ पुजेच्या निमित्ताने मोठी राजकीय चढाओढीची शक्यता वर्तवली जात आहे. एका बाजुला छठ पुजेच्या निमित्ताने भाजपाने आपली सर्व ताकद लावण्याचा प्रयत्न केला आहे. छट पुजेचे आयोजन आणि त्याची योग्यप्रकारची व्यवस्था यासाठी भाजपाचा महापालिकेसोबत पाठपुरावा पाहता याचे श्रेय जास्तीत जास्त आपल्या पारड्या पाडून घेण्याचा प्रयत्न असला तरी आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठीच्या मुद्यावरुन छट पुजेला विरोध करायचा कि उत्तर भारतीयांचे मते आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे या द्विधा मनस्थितीत उबाठा आणि मनसेचे नेते अडकल्याने यंदाच्या छट पुजेच्या कार्यक्रमाला आगळेवेगळे महत्व पहायला मिळणार आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छठ पूजा हा केवळ धार्मिक उत्सव राहिलेला नाही, तर ती एक उत्तर भारतीय मतदारांना आपल्याकडे वळवण्याची एक मोठी राजकीय संधी मानली जात आहे. मुंबई परिसरात २७ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०२५ दरम्यान साजऱ्या होणाऱ्या छट पुजेनिमित्त भाविकांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा आणि महापालिकेची तयारी याबाबत महापालिका मुख्यालयात मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी आढावा घेतला. मुंबई परिसरात छट पूजा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार असून,शहर आणि उपनगरातील एकूण ४० पूजास्थळे यासाठी निश्चित करण्यात आली होती,परंतु भाजपाच्या मागणीनंतर आता हा आकडा ६०पूजा स्थळापर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी महापालिका प्रशासनाने दिले आहे. या छट पुजे करता महापालिकेकडून विविध सेवा सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच उत्सवादरम्यान शहरातील मेट्रो आणि बेस्ट बस सेवा रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार आहे.

मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय असून, अनेक वॉर्डांमध्ये ते निर्णायक भूमिका बजावतात. बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमधील लोकांमध्ये छठ पूजा हे सर्वात महत्त्वाचे आणि श्रद्धेचे पर्व आहे. या उत्सवासाठी नदीकिनारी, तलावांवर किंवा कृत्रिम तलावांवर व्यवस्था करणे, स्वच्छता राखणे, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षितता पुरवणे ही महापालिका आणि पोलिसांची जबाबदारी असते. मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांची संख्या महापालिकेच्या अनेक प्रभागांमध्ये निर्णायक असल्याने याच मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपा प्रमाणेच उबाठा आणि मनसेनेही 'छठ पूजे'च्या निमित्ताने या नागरिकांशी संवाद साधण्याची रणनिती अवलंबली असल्याचे दिसून येत आहे. उबाठा आणि मनसे यांनी यापूर्वी परप्रांतिय मुद्दा यापूर्वी लावून धरला असला तरी त्यांची राजकीय भूमिका आता बदलत चालली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी जैन आणि मारवाडी समाजाला टार्गेट करत परप्रांतिय मुद्दयाला वेगळे वळण दिले आहे, यातूनच उत्तर भारतीय,बिहारी जनतेला कवटाळून भाजपाकडील पारंपारिक मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा विचार आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षाकडून छठ पुजेच्या कार्यक्रमासाठी विरोध होण्याची शक्यता कमी आहे, उलट दोन्ही पक्ष या छठ पुजेच्या कार्यक्रमात सहभागी होती, किंबहुना ते या कार्यक्रमाबाबत कोणतीही भूमिका जाहीर करणार नाही असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी छठ पूजेसाठी व्यवस्था करण्याची मागणी करत उत्तर भारतीय मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता. आता महाविकास आघाडीतील घटक पक्षही या उत्सवाच्या आयोजनात सक्रिय राहून, उत्तर भारतीयांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याने यंदाची छठ पुजेसाठी महापालिकेसह सर्व यंत्रणांची चोख व्यवस्था पुरवून विशेष काळजी घेतली जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जो पक्ष छठ पूजेचे आयोजन आणि सुविधांसाठी सर्वोत्तम पाठिंबा देईल, त्या पक्षाला उत्तर भारतीय मतदारांचा अधिक पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. हे थेट निवडणुकीतील मतांमध्ये रूपांतरित होऊ शकते याची काळजी यंदा सर्वच पक्षांकडून घेतली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment