Saturday, October 25, 2025
Happy Diwali

‘मांजरांचे बेट’ अशी ओळख असलेलं अनोखं ठिकाणं

‘मांजरांचे बेट’ अशी ओळख असलेलं अनोखं ठिकाणं

टोकियो  : जगात अनेक रहस्यमय आणि अनोखी ठिकाणे आहेत; पण जपानमधील एका बेटाने आपल्या वैशिष्ट्यांमुळे पर्यटकांना आकर्षित केले आहे. जपानमधील ताशिरो-जिमा बेटाला जगभर ‘मांजरांचे बेट’ म्हणून ओळखले जाते. या छोट्या बेटावर मांजरींची संख्या तेथील मानवी वस्तीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.

ताशिरो-जिमा हे बेट जपानच्या मियागी प्रांतातील इशिनोमाकी शहराच्या किनाऱ्याजवळ आहे. पूर्वी हे बेट रेशीम उत्पादनासाठी आणि मासेमारीसाठी प्रसिद्ध होते. येथे रेशीम किड्यांना त्रास देणाऱ्या उंदरांना नियंत्रित करण्यासाठी मांजरींना मोठ्या प्रमाणात आणले गेले. बेटावरील मच्छीमार मांजरींना शुभ आणि सौभाग्याचे प्रतीक मानतात. मांजरी त्यांच्या मासेमारीच्या बोटींसाठी चांगले हवामान आणि भरपूर मासे आणतात, असा येथील लोकांचा विश्वास आहे. येथील लोक मांजरींची काळजी घेतात आणि त्यांना खायला देतात. त्यामुळे त्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. या बेटावर राहणाऱ्या माणसांची संख्या सुमारे १०० पेक्षा कमी आहे, तर मांजरींची संख्या ५०० हून अधिक असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, मांजरांच्या हितासाठी आणि संरक्षणासाठी या बेटावर कुत्र्यांना आणण्यास सक्त मनाई आहे. या बेटावर मांजरीचे छोटे मंदिर देखील आहे, जिथे मासेमारी करताना अपघातात मरण पावलेल्या मांजरींसाठी प्रार्थना केली जाते. ताशिरो-जिमा बेटावरील शांत वातावरण आणि सर्वत्र मुक्तपणे फिरणाऱ्या मांजरी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. मांजरींबरोबर खेळणे आणि त्यांना खायला देणे, हा पर्यटकांसाठी एक वेगळा अनुभव असतो.

Comments
Add Comment