Saturday, October 25, 2025
Happy Diwali

सोन्याचा हार कचऱ्यात गेला; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोधाशोध झाली आणि अखेर...

सोन्याचा हार कचऱ्यात गेला; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोधाशोध झाली आणि अखेर...

कल्याण : सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. अशा काळात सोनं जपून ठेवणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. पण कल्याणमधील एका महिलेचा चुकून सोन्याचा हार घरातील कचऱ्यासोबत बाहेर फेकला गेला आणि त्यामुळे तिच्या कुटुंबातील सदस्य घाबरले. मात्र सफाई कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे अखेर तो मौल्यवान हार पुन्हा मिळवण्यात यश आलं.

ही घटना कल्याण (पूर्व) परिसरातील आहे. केडीएमसीच्या सुमित कंपनीचे सफाई कर्मचारी नेहमीप्रमाणे सकाळी विविध भागातून कचरा गोळा करत होते. तो कचरा कचोरे टेकडी येथील इंटरकटिंग केंद्रावर पाठवला जात होता. दरम्यान, सुमित कंपनीचे अधिकारी समीर खाडे यांना एका महिलेने फोन करून सांगितलं की तिने चुकून सोन्याचा हार कचऱ्यात टाकला आहे. ही माहिती मिळताच खाडे यांनी तात्काळ सफाई कर्मचाऱ्यांना आणि केंद्रावरील गाडी चालकाला सूचित केलं.

महिला आणि तिचं कुटुंब इंटरकटिंग केंद्रावर पोहोचलं. तिथं आलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सर्वांनी मिळून शोधमोहीम सुरू केली. बराच प्रयत्नांनंतर त्या ढिगाऱ्यातून महिलेला तिचा सोन्याचा हार सापडला. हार मिळताच तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले आणि उपस्थित सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

प्रामाणिकपणामुळे आणि तत्परतेमुळे सुमित कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं परिसरात कौतुक होत आहे. समाजात अशा कर्मचाऱ्यांमुळे अजूनही माणुसकी जिवंत असल्याचा विश्वास पुन्हा दृढ झाल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे.

Comments
Add Comment