मुंबई : चोर सोडून संन्याशाला फाशी ही म्हण मुंबईतील गोरेगावमध्ये काही प्रमाणात खरी ठरली. गोरेगावच्या तीन डोंगरी परिसरात चार कामगारांनी चोर समजून केलेल्या मारहाणीत हर्षल रामसिंग परमा या २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी सलमान खान, इसमुल्ला खान, गौतम चमार आणि राजीव गुप्ता या चौघांना गोरेगाव पोलिसांनी अटक केली.
हर्षल हा आई सुवर्णा आणि वडील रामसिंग परमा यांच्यासह मोतीलाल नगर, गोरेगाव येथे राहत होता. रात्री तो दारू पिण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. पहाटेच्या सुमारास तो राज पॅथ्रोन इमारतीजवळ आला तेव्हा नशेत होता. इमारतीत काम करणाऱ्या चार कामगारांनी चोर समजून हर्षलला घेरले आणि पकडले. हर्षलचे हातपाय बांधून नंतर त्याला मरेपर्यंत चोपले. या मारहाणीत हर्षलचा मृत्यू झाला. हर्षलला बेदम मारहाण करणारे चौघेजण थोड्या वेळाने घटनास्थळावरुन पसार झाले. इमारतीचा सुरक्षारक्षक पप्पू दूधनाथ यादव याने हर्षलला बघितले आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येताच हर्षलला तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी करुन हर्षलचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी चौकशी केली आणि चार कामगारांच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला. गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी हर्षलची हत्या करणाऱ्या चौघांना शोधले आणि त्यांना अटक केले.
अटक केलेले चौघेजण राज पॅथ्रोन इमारतीत बांधकाम मजूर म्हणून कार्यरत होते. दिवसा काम करून ते इमारतीतच राहत असत. प्राथमिक चौकशीत त्यांनी हर्षलला चोर समजून मारहाण केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांना अटक करून बोरिवली येथील स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी इमारत तसेच भोवतालच्या परिसरातल्या सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने आणि साक्षीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला आहे.