Friday, October 24, 2025
Happy Diwali

बंगळुरू-हैदराबाद महामार्गावर भीषण बस अपघात, २० जणांचा मृत्यू; जयंत कुशवाहाचा थरकाप उडवणारा अनुभव

बंगळुरू-हैदराबाद महामार्गावर भीषण बस अपघात, २० जणांचा मृत्यू; जयंत कुशवाहाचा थरकाप उडवणारा अनुभव

हैदराबाद : बंगळुरू-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी पहाटे भीषण अपघात घडला. प्रवाशांनी भरलेल्या बसने अचानक पेट घेतल्याने २० जणांचा मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले. मृत्यूच्या दारातून थोडक्यात सुटलेला जयंत कुशवाहा याने या भीषण प्रसंगाचा थरकाप उडवणारा अनुभव सांगितला.

कुशवाहा म्हणाला, पहाटे साधारण २.३० वाजता बसमध्ये धूर दिसू लागला. काही क्षणांतच आग भडकली. आम्हाला वाटलं बसचा अपघात झाला आहे. बाहेर पाहिलं तेव्हा समोर आणि मागे ज्वाळा उठत होत्या. सर्व प्रवासी झोपेत होते, फक्त काही जण जागे होते. आम्ही सर्वांना ओरडून जागं केलं आणि बाहेर पडायचा प्रयत्न सुरू केला. मात्र मुख्य दरवाजा बंद होता.

कुशवाहा पुढे म्हणाला, मी बसच्या मध्यभागी सीट क्रमांक U-7 वर होतो. खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला, पण ती अडकली होती. शेवटी आम्ही एकत्र येऊन मागची खिडकी तोडण्याचा प्रयत्न केला. बुक्के, लाथा मारून काचेची खिडकी फोडली आणि वरून उडी मारली. बसमध्ये धूर पसरत होता, श्वास घेणंही कठीण झालं होतं. आम्ही विचार न करता उडी मारली काही डोक्यावर तर काही पाठीवर पडले. पण जिवंत बाहेर पडलो हेच नशिब.

कुशवाहाच्या मते, मागून सुमारे ११ प्रवासी बाहेर आले, तर काही ड्रायव्हरच्या बाजूची खिडकी फोडून बाहेर आले. बाहेर आल्यानंतर एका पोलिस अधिकाऱ्याने तत्काळ अग्निशमन दलाला बोलावले. काही मिनिटांतच बचावकार्य सुरू झाले. जखमींना तातडीने बेंगळुरू आणि हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार, बसचा इंजिन भाग ओव्हरहिट झाल्यामुळे आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment