मुंबई :“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित ठेवावे. भविष्यात जेव्हा भारताचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा मोदींचा करिष्मा काय होता, हे सर्वांना कळेल. या पुस्तकातील काही भाग शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करायला हवा,” अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. “या पुस्तकातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत लेखक बर्जिस देसाई यांनी लिहिलेले ‘मोदीज् मिशन’ या पुस्तकाचे प्रकाशन राजभवन येथे पार पडले. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस, बर्जिस देसाई, मंत्री, खासदार, आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी फेक नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या वातावरणात सत्य मांडण्याचे धाडस दाखवल्याबद्दल शिंदे यांनी बर्जिस देसाई यांचे कौतुक केले.
शिंदे म्हणाले, ‘मोदिज् मिशन’ हे केवळ चरित्र नसून त्यांच्या कार्याचा, दृष्टिकोनाचा आणि संघर्षाचा सत्यदर्शी आलेख आहे. मोदींचे व्यक्तिमत्व एका पुस्तकात सामावणे अशक्य आहे. मोदी हे नाव देशाचे वर्तमान आणि भविष्य दोन्ही आहे. मिशन इम्पॉसिबल हा चित्रपट आला, पण नरेंद्र मोदींनी गेल्या अकरा वर्षांत खरोखरच ‘इम्पॉसिबल’ काम शक्य करून दाखवले आहे. या काळात देशात झालेला बदल हा सकारात्मक आणि व्यावहारिक आहे. आज जग भारताकडे आदराने पाहत आहे.
"मोदींना तीन वाटा खुल्या होत्या. रामकृष्ण मिशनचे साधू बनणे, सैन्यात जाणे किंवा संघाचे प्रचारक बनणे. देशाचे भाग्य एवढे चांगले की ते संघाचे प्रचारक झाले आणि आज देशाचे पंतप्रधान आहेत. संत झाले नाहीत, पण राममंदिर उभारले; सैन्यात गेले नाहीत, पण पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरने धडा शिकवला", असे शिंदेंनी आपल्या भाषणात सांगितले.
“टीका करणारे करत राहतील, पण मोदीजी काम करत राहतील. ‘सबका साथ, सबका विकास’ हा देशाचा मंत्र बनला आहे. मोदींची अकरा वर्षांची कारकीर्द हा फक्त ट्रेलर आहे — पिक्चर अभी बाकी है,” असे ते म्हणाले. “लोकांच्या हृदयावर राज्य करणारा नेता कोण, याचे उत्तर फक्त एकच नरेंद्र मोदी,” असे गौरवोद्गार शिंदे यांनी यावेळी बोलताना काढले.






