मोहित सोमण:आज मिडवेस्ट लिमिटेड कंपनीचा शेअर बाजारात सूचीबद्ध झाला आहे. कंपनीने निश्चित केलेल्या मूळ प्राईज बँडपेक्षा ९% प्रिमियम दराने हा शेअर बाजारात सूचीबद्ध झाला आहे. त्यामुळे मूळ किंमत असलेल्या १०६५ रूपयांच्या तुलनेत हा शेअर ११६५.१० रूपये प्रति शेअरवर सूचीबद्ध झाला. अप्पर बँडपेक्षा प्रिमियम दराने हा शेअल बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी या शेअरला मोठा प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट केले. बाजाराच्या अखेरीस हा शेअर ७.०९% प्रिमियमसह ११४०.५० रूपये प्रति शे अरवर बंद झाला आहे.
कंपनीचा आयपीओ (IPO) १७ ते २० ऑक्टोबर दरम्यान बाजारात गुंतवणूकदारांसाठी दाखल झाला होता. १०६५ रूपये प्रति शेअरप्रमाणे प्राईज बँड निश्चित करण्यात आला होता. आज हा शेअर बीएसई व एनएसईवर सूचीबद्ध झाला आहे. किरकोळ गुंतवणू कदारांकडून किमान १४९१० रूपयांचे (१४ शेअर) बिडिंग निश्चित करण्यात आले होते.
माहितीनुसार कंपनीच्या आयपीओला अखेरच्या दिवसापर्यंत एकूण ९२.३६ पटीने दमदार सबस्क्रिप्शन मिळाले आहे. एकूण सबस्क्रिप्शनपैकी किरकोळ (Retail) गुंतवणूकदारांकडून २५.५२ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (QIB) १४६.९९ पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (NII) १७६.५७ पटीने सबस्क्रिप्शन आयपीओला मिळाले.
एमएल (Midwest Ltd) ही अॅब्सोल्युट ब्लॅक ग्रॅनाइट आणि ब्लॅक गॅलेक्सी ग्रॅनाइट उत्पादन करणारी सर्वात मोठी भारतीय कंपनी आहे आणि निर्यातीतून कंपनीला सुमारे ७०% उत्पन्न मिळते. भारतातील विविध राज्यांमधील ६ ठिकाणी १६ ग्रॅनाइट खाणकामाचे अधिकार देखील त्यांच्याकडे आहेत. उपलब्ध माहितीनुसार, कंपनीने टॉप व बॉटम महसूलात स्थिर वाढ नोंदवली आहे.






