मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय संघाने उपांत्य फेरीसाठी आपली जागा निश्चित केली आहे. विश्वचषकाच्या २४व्या आणि महत्त्वाच्या सामन्यात भारत विरूद्ध न्यूझीलंड असा सामना झाला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला. त्यामुळे उपांत्य फेरीतील उर्वरीत एका जागेवर भारताने आपले नाव लिहीले आहे. मात्र भारताचा बांग्लादेशसोबतचा एक सामना बाकी आहे. ज्यामुळे गुणतालिकेत बदल होऊ शकतो.
उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४९ षटकात ३ गडी गमवून ३४० धावा केल्या. पण पावसाच्या व्यत्ययामुळे षटकं कमी करण्यात आली. डकवर्थ लुईस नियमानुसार न्यूझीलंडसमोर ४४ षटकात ३२५ धावांचे सुधारित आव्हान ठेवण्यात आले. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने शेवटपर्यंत झुंज दिली. न्यूझीलंडच्या संघाने ८ विकेट गमवून २७१ धावा केल्या. त्यामुळे भारत हा सामना ५३ धावांनी जिंकला. या विजयासह भारताने उपांत्य फेरी गाठली आहे. पण भारताचा उपांत्य फेरीपूर्वीचा अजून एक सामना बाकी आहे.
भारताची उपांत्य फेरीतील जागा निश्चित झाली आहे. पण अजूनही न्यूझीलंड आणि श्रीलंकेकडे संधी आहे. न्यूझीलंडचा शेवटचा सामना इंग्लंडशी तर श्रीलंकेचा शेवटचा सामना पाकिस्तानशी आणि भारताचा शेवटचा सामना बांगलादेशसोबत होणार आहे. भारत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पराभूत झाला तर या दोन संघांना उपांत्य फेरीसाठी संधी मिळू शकते. शेवटचा सामन्यात जर हे तीनही संघ जिंकले तर भारत, न्यूझीलंड आणि श्रीलंकेचे प्रत्येकी ६ गुण होतील. पण नेट रनरेटच्या आधारावर चौथा संघ भारतच असू शकतो हे निश्चित आहे. त्यामुळे भारताने सामना गमावला तरी नेट रनरेटच्या आधारावर तिकीट मिळेल. पण भारताने बांगलादेशला शेवटच्या सामन्यात पराभूत केलं तर प्रश्नच उरणार नाही.






