आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण वाटतं. मात्र, काहीजण एक एक करत न मोजता पोळ्या खातात आणि याच सवयीमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. आवश्यकतेपेक्षा जास्त पोळ्या खाल्ल्यास शरीरावर नकारात्मक परिणाम होतो, असे तज्ज्ञ सांगतात.
जास्त पोळ्या खाल्ल्याने होणारे दुष्परिणाम
गव्हाच्या पिठामध्ये कार्बोहायड्रेटचे म्हणजेच कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जास्त पोळ्या खाल्ल्यास शरीरात अतिरिक्त कार्बोहायड्रेट साचते आणि वजन वाढते. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर पोळ्यांचे प्रमाण नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. तसेच, जास्त गव्हाचे सेवन केल्यास रक्तातील साखरेचा स्तर वाढतो, जे मधुमेही रुग्णांसाठी घातक ठरू शकते.
याशिवाय, गव्हात असणाऱ्या ग्लुटन नावाच्या प्रोटीनमुळे काहींना गॅस, पोट फुगणे किंवा जडपणा जाणवू शकतो. रात्रीच्या वेळी जास्त पोळ्या खाल्ल्यास या समस्या अधिक वाढतात. तसेच, जर आहारात भाज्या आणि फळांचे प्रमाण कमी असेल आणि फक्त पोळ्यांवर अवलंबून राहिलात, तर फायबरच्या अभावामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
एका दिवसात किती पोळ्या योग्य?
तज्ज्ञांच्या मते, एका गव्हाच्या पोळीत सुमारे १७ ग्रॅम कार्बोहायड्रेट असते आणि ती साधारण ७० कॅलरीज देते. त्यामुळे प्रौढ व्यक्तीसाठी दिवसाला २ ते ३ पोळ्या खाणे आरोग्यासाठी योग्य मानले जाते. मात्र हे प्रमाण तुमच्या शारीरिक क्रियाशीलता, वय, लिंग आणि वजनावर अवलंबून बदलू शकते.
थोडक्यात सांगायचं झालं तर, वजन नियंत्रणात ठेवायचं असेल, पचन सुधारायचं असेल आणि शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल, तर पोळ्यांचे प्रमाण मर्यादित ठेवा. संतुलित आहारात डाळ, भाजी, फळं आणि पुरेसं पाणी यांचाही समावेश असावा. त्यामुळेच खरं आरोग्य टिकून राहील.






