Friday, October 24, 2025
Happy Diwali

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (एमयुएचएस) या संस्‍थेच्‍या कुलगुरुपदी नियुक्‍ती केली आहे. ही नियुक्‍ती पुढील सहा महिन्‍यांसाठी असेल. याबाबतचा आदेश ‘एमयुएचएस’ चे कुलपती आचार्य देवव्रत यांनी जारी केल्‍यानंतर त्‍यावरून राज्‍यपाल कार्यालयाचे सचिव प्रशांत नारनवरे यांनी गुरुवारी (ता. २३) आदेश निर्गमित केले आहेत. डॉ. चंदनवाले यांच्‍याकडे ‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरू पदाबरोबर वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक (डीएमईआर) या पदाचीही धुरा असणार आहे.

याआधी ‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर या होत्‍या. त्‍यांचा कार्यकाळ १४ ऑक्‍टोबर रोजी संपल्‍याने त्‍या सेवानिवृत्‍त झाल्‍या असून रिक्‍त पदावर डॉ. चंदनवाले यांची नियुक्‍ती झाली आहे. डॉ. चंदनवाले यांनी ससून रुग्‍णालयात अधिष्‍ठाता पदावर दहा वर्षे होते. त्‍यांच्‍या कार्यकाळात त्‍यांनी ससून रुग्‍णालयात विविध उपक्रम व योजना राबवत रुग्‍णालयामध्‍ये सुधारणा केली. यामध्‍ये प्रामुख्‍याने रुग्‍णालयातील विविध सुविधा व श्रेणीवर्धनासाठी १०० कोटींहून अधिक निधी हा विविध सामाजिक संस्‍था, उद्योजक यांच्‍या माध्‍यमातून ‘सामाजिक उत्तरदायित्व निधी’ (सीएसआर फंड) उभा केला. त्‍याचा थेट फायदा गोरगरीब रुग्‍णांना झाला. यामध्‍ये अद्ययावत आपत्कालीन विभाग विभाग, ५९ खाटांचा नवजात कक्ष, दगडूशेठ हलवाई मंदिराकडून रुग्‍णांसाठी मोफत भोजन यांचा उल्‍लेख करता येईल.

कोरोना काळात २०२० मध्‍ये त्‍यांची नियुक्‍ती ‘डीएमईआर’ च्‍या सहसंचालक पदावर झाली. तर जुलै २०२३ मध्‍ये ते प्रभारी संचालक झाले. तर काही महिन्‍यांपूर्वी ते पूर्णवेळ संचालक देखील झाले. आता त्‍यांच्‍याकडे एमयुएचएस’ च्‍या कुलगुरुपदाची जबाबदारी सोपविण्‍यात आली असून या पदाला न्‍याय देणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >