Saturday, December 6, 2025

दोन वर्षीय चिमुकलीवर गुन्हा दाखल; पोलिसांवर प्रश्नचिन्ह

दोन वर्षीय चिमुकलीवर गुन्हा दाखल; पोलिसांवर प्रश्नचिन्ह

कल्याण : कल्याणनजीक असलेल्या मोहने येथे फटाके फोडण्याच्या वादातून काल दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणी एका दोन वर्षाच्या मुलीला आरोपी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दोन्ही गटांच्या विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी एका गटाच्या गुन्ह्यात चिमुकलीवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या घटनेत जखमी असलेल्या संध्या साठे यांनी सांगितले की, त्यांच्यासह अनेकांना एका गटाकडून मारहाण झाली. आमच्यापैकी जखमींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. जखमींमध्ये आमच्यासोबत असलेली एक दोन वर्षांची मुलगीदेखील होती. पोलिसांनी या दोन वर्षांच्या मुलीलाही गुन्ह्यात आरोपी केले आहे. ही बाब जेव्हा आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले तेव्हा वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

या प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना अटक केली होती. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, त्यापैकी पाच जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तर तीन जणांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Comments
Add Comment