Friday, October 24, 2025
Happy Diwali

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार विभागाने मोठे पाऊल उचलले आहे. लवकरच देशात ‘भारत टॅक्सी’ ही नवी सहकारी टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. ही सेवा ‘मल्टी-स्टेट सहकारी टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड’ अंतर्गत चालवली जाणार असून, देशातील पहिलीच सहकारी टॅक्सी सेवा म्हणून ती ओळखली जाईल.

या प्रकल्पाचा पायलट टप्पा सुरुवातीला महाराष्ट्र, गुजरात,उत्तर प्रदेश आणि दिल्ली या चार राज्यांमध्ये राबवला जाणार आहे. त्यानंतर या सेवेला टप्प्याटप्प्याने संपूर्ण देशभर विस्तार करण्यात येईल. ‘भारत टॅक्सी’ची सर्वात मोठी खासियत म्हणजे, या उपक्रमात चालक हे फक्त नोकर नसून सहकारी संस्थेचे सह-मालक असतील. त्यामुळे या व्यवसायातील नफा थेट चालकांपर्यंत पोहोचेल, त्यांची आर्थिक पिळवणूक थांबेल आणि त्यांना व्यवसायात सन्मानासह सहभाग मिळेल.

ओला-उबरसारख्या ॲप आधारित सेवांमध्ये चालकांकडून घेतले जाणारे जास्त कमिशन या सहकारी मॉडेलमध्ये पूर्णतः रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे चालकांना ‘नो-कमिशन’ धोरणाचा थेट लाभ मिळणार असून, त्यांचे मासिक उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढेल. याशिवाय, प्रवाशांसाठीही या सेवेतील दर पारदर्शक आणि परवडणारे ठेवले जाणार आहेत.

या सेवेत ‘नो-सर्ज प्राइसिंग’ प्रणाली लागू केली जाणार आहे, म्हणजेच सणासुदीच्या काळात किंवा जास्त मागणी असताना दर वाढवले जाणार नाहीत. यामुळे प्रवाशांना नेहमीच स्थिर दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध राहील. या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी ३०० कोटी रुपयांचे अधिकृत भांडवल उभारण्यात आले असून, देशातील आठ प्रमुख सहकारी संस्थांचा या प्रकल्पाला भक्कम पाठिंबा आहे. यामध्ये अमूल, इफको, आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ (एनसीडीसी) यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांचा समावेश आहे. या सहकारी टॅक्सी संस्थेच्या अध्यक्षपदी अमूलचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांची निवड करण्यात आली आहे. नियोजनानुसार, या वर्षाअखेरीस ‘भारत टॅक्सी’ ॲपचे राष्ट्रीय स्तरावर लोकार्पण होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >