Friday, October 24, 2025
Happy Diwali

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही मुले आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवत असल्यानं भारतीय संस्कृती लोप पावल्याचा आरोप तरुणांईवर करण्यात येत आहे. मात्र कर्नाटकमध्ये आधुनिक श्रावणबाळ असल्याचं दिसून आलं आहे. या आधुनिक श्रावणबाळाने आपल्या ८५ वर्षीय आईला विठूरायाच्या दर्शनासाठी चक्क कर्नाटक ते महाराष्ट्र असे खांद्यावर घेऊन प्रवास सुरू केला आहे. सदाशिव बाणी असे या आधुनिक श्रावणबाळाचे नाव असून तो बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील केम्पट्टी गावातील रहिवासी आहे. त्याने ८५ वर्षीय आई सत्यव्वा यांना घेऊन हा प्रवास सुरू केला आहे.

ऊन, पाऊस आणि वाऱ्याचा सामना करत सदाशिव दररोज तब्बल २० ते २५ किमी चालतो. मात्र जिथे सूर्यास्त होईल, तिथं विश्रांती घेतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी हे दोघे आपला प्रवास सुरू करतात. सदाशिव त्याच्या आईला खांद्यावर घेऊन २ नोव्हेंबरला कार्तिक एकादशीपर्यंत पंढरपूरला पोहोचणार असल्याचे त्याने सांगितले. आईला खांद्यावर घेऊन विठूरायाच्या दर्शनाला आणत असलेल्या सदाशिवने सांगितले की, "आपण अशा काळात जगत आहोत, जिथे बरेच जण पालकांना वृद्धाश्रमात सोडून जातात. आपले पालक आपल्याला या जगात आणतात. त्यासाठी त्यांना असंख्य गोष्टींचा त्याग करावा लागतो. मात्र फार कमी जण त्यांच्या त्यागाची जाण ठेवतात. पालकांची सेवा करणे हीच खरी उपासना आहे."
सदाशिव हा कर्मठ विठ्ठलभक्त आहे. आईला खांद्यावरुन विठूरायाच्या चरणी आणण्यासाठी कशी प्रेरणा मिळाली, याबाबत त्याला विचारलं असता, तो म्हणाला की, "काही वर्षांपूर्वी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान केल्यानंतर ही तिर्थयात्रा सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. त्या दिवशी माझ्या आत काहीतरी बदल झाला, असं जाणवलं. त्यामुळे जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी दरवर्षी माझ्या आईला विठ्ठलाच्या दर्शनाला घेऊन जाईन, असं मी ठरवलं. यामुळे मला शांती आणि आनंद मिळला," असं त्यानं स्पष्ट केलं.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा