गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सोमवारी वितरण
मुंबई : महाराष्ट्रातील मच्छिमार सहकारी संस्थांसाठी २०० मीटरपेक्षा अधिक खोल समुद्रातील मच्छिमारीसाठी नौका उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अंतर्गत राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडून आर्थिक साहाय्य दिले जात असून, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून संबंधित योजनेअंतर्गत राज्यातील सात सागरी जिल्ह्यांमधील एकूण १४ मच्छिमार सहकारी संस्थांची या योजनेसाठी निवड करण्यात आली आहे.
या मच्छीमार संस्थांना खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी अद्यायवत सेवा सुविधांनी परिपूर्ण असलेल्या बोटीचे वितरण केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी मुंबई माझगाव डॉक येथे दुपारी १२.३० वाजता होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
प्रकल्पाचा उद्देश राज्यातील मच्छिमार सहकारी संस्थांची खोल समुद्रातील मासेमारी क्षमता वाढविणे, भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील ट्यूना तसेच इतर सागरी मासे संसाधनांचा शाश्वत पद्धतीने वापर प्रोत्साहित करणे आणि त्याद्वारे मच्छिमारांचे उत्पन्न वाढविणे असा आहे.
या उपक्रमामुळे खोल समुद्रातील साधनसामग्री उपलब्ध होऊन माशांच्या उत्पादनात वाढ होण्याबरोबरच मच्छिमारांच्या आर्थिक स्थितीतही सकारात्मक बदल होणार आहे. या बोटी स्टीलच्या असून संपूर्ण अध्याय होत आहेत.खोल समुद्रामध्ये मासेमारी करू शकतात. खोल समुद्रातील मासेमारीत १२ लाख टन दर वर्षी उत्पन्न क्षमता या बोटी मुळे वाढू शकते.