
मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्युप्रकरणाला आता तब्बल चार वर्षांहून अधिक काळ उलटला असला तरी या घटनेची चर्चा आजही सुरूच आहे. मात्र, या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमधून एक मोठा खुलासा झाला आहे.
सीबीआयच्या या रिपोर्टनुसार, अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांतला बेकायदेशीरपणे कोंडून ठेवले होते, धमकी दिली होती किंवा आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले होते, असे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. तसेच रियाने सुशांतच्या मालमत्तेचा किंवा पैशांचा अपहार केला, हेही सिद्ध झालेले नाही.
रिपोर्टनुसार, राजपूत यांच्या कुटुंबाने आणि कायदेशीर टीमने सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. असे त्यांचे वकील वरुण सिंह यांच्याकडून माहिती समोर आलीय. वकील वरुण सिंह म्हणाले, "हे केवळ डोळ्यांत धूळफेक करण्यासारखे आहे. जर सीबीआयला खरोखरच सत्य बाहेर यायचे असेल तर त्यांनी क्लोजर रिपोर्टसह अन्य रिपोर्ट, कागदपत्रे कोर्टात सादर केली असती, जी त्यांनी केली नाही. आम्ही या क्लोजर रिपोर्टविरुद्ध निषेध याचिका दाखल करू."
दी फेडरेल अँटी - करप्शन प्रोब एजन्सीने या वर्षी मार्चमध्ये दोन क्लोजर रिपोर्ट दाखल केले होते. एक, सुशांत सिंगचे वडील के के सिंग यांनी पाटणा येथे दाखल केलेल्या खटल्यात, ज्यात रिया आणि तिच्या कुटुंबाने त्यांच्या मुलाला आत्महत्या करण्यास भाग पाडले आणि त्याच्या पैशाचा अपहार केला, असा आरोप केला होता. दुसरा, रियाने मुंबईत राजपूतच्याच्या बहिणींविरुद्ध दाखल केलेला खटला.
सूत्रांच्या माहितीनुसार, तपासादरम्यान सीबीआयने सर्व आर्थिक व्यवहार, मोबाईल डेटा, चॅट्स आणि वैद्यकीय अहवालांची तपशीलवार चौकशी केली. मात्र त्यातून रियाविरुद्ध कोणताही गुन्हेगारी हेतू आढळला नाही.
सुशांत आणि रियाचं नातं २०१९ पासून चर्चेत आलं होतं. दोघे काही काळ एकत्र राहत होते. सुशांतच्या मृत्यूनंतर रिया आणि तिच्या कुटुंबावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. एनसीबी आणि ईडीनेही चौकशी केली होती. परंतु आता सीबीआयच्या निष्कर्षानंतर रियावरील सर्व शंका जवळपास संपुष्टात आल्या आहेत. पण आता सिंग कुटूंब पुन्हा या प्रकरणाला आव्हान द्यायला तयार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, मुख्य क्लोजर रिपोर्टमधील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रिया; तिचे पालक इंद्रजीत चक्रवर्ती आणि संध्या चक्रवर्ती; भाऊ शोविक; राजपूतची मॅनेजर श्रुती मोदी आणि हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांच्यावरील आरोपांशी संबंधित ही माहिती आहे.
रिया आणि तिचा भाऊ शोविक ८ जून रोजी घराबाहेर पडले होते आणि त्यानंतर ते घरी आले नाहीत. सुशांतने १० जून रोजी दुपारी २.४१ वाजता व्हॉट्सअॅपद्वारे शोविकशी बातचीत केली होती. परंतु ८ जून ते १४ जून दरम्यान रियाशी कोणताही संवाद झाला नाही. सुशांतची रिया किंवा तिच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी इतर कोणत्याही प्रकारे संपर्कात असल्याचे पुरावे रेकॉर्डवर नाहीत. शिवाय, मीतू सिंग (सुशांतची बहीण) ८ जून ते १२ जून दरम्यान त्याच्या फ्लॅटमध्ये त्याच्यासोबत राहिली होती," असे एका अधिकाऱ्याने क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले आहे.