
अॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना अॅडलेड येथे सुरू आहे. या सामन्यात तसेच आधी झालेल्या पर्थमधील सामन्यात विराट कोहली शून्य धावा करुन बाद झाला. सलग दोन एकदिवसीय सामन्यात विराट कोहली शून्य धावा करुन बाद झाला.लागोपाठ दोन वेळा अपयशी ठरलेला विराट कोहली कसोटी आणि टी २० पाठोपाठ एकदिवसीयक्रिकेटमधूनही निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सोशल मीडियात सुरू झाली आहे.
विराट कोहली १७ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच लागोपाठच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये शून्य धावा करुन बाद झाला आहे. अॅडलेडच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झेवियर बार्टलेटने विराटला बाद केलं. सुरुवातीपासूनच कोहली क्रीझवर संघर्ष करताना दिसत होता. त्याच्या खेळात आत्मविश्वासाची कमतरता जाणवत होती. त्यामुळे आता कोहलीसाठी ही मालिका निर्णायक ठरू शकते, कारण भारत सध्या संघ बांधणीच्या टप्प्यात आहे.Virat Kohli says goodbye to the Adelaide Oval and the fans. pic.twitter.com/S53pQa78iv
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 23, 2025
ज्या अॅडलेडच्या मैदानावर कोहलीने अनेक अविस्मरणीय खेळी केल्या आहेत त्याच ठिकाणी तो अपयशी झाला. पण चाहत्यांनी त्याच्या आतापर्यंतच्या कामगिरीची आठवण ठेवून कोहली पॅव्हेलियनमध्ये जात असताना उभं राहून आदराने टाळ्या वाजवल्या.
आता मालिकेत फक्त एकच सामना उरला असून, कोहलीसमोर स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याची हीच संधी आहे. अन्यथा, भारतीय संघात बदलाच्या काळात त्याला जागा टिकवणे कठीण ठरू शकते. सलग दोन ‘डक’नंतर विराटला या मालिकेतील शेवटच्या सामन्यात मोठी खेळी करणे गरजेचे आहे, अन्यथा हा नकोसा विक्रम त्याच्या कारकिर्दीवर काळी छाया टाकू शकतो.