
मुंबई : आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा ठाकरे बंधूंसोबत एकत्र लढणार नाही, असे वक्तव्य मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी केले. या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि मनसेच्या आगामी काळातील भूमिकेच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
राज ठाकरे सोडाच पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही अशी भूमिका मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी मांडली. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात, नेत्यांच्या नाही. जे काँग्रेस कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन आहेत, त्यांचीही इच्छा असते, आपणही कधी ना कधी निवडणूक लढवावी. त्यामुळे या निवडणुका कार्यकर्त्यांना लढू द्या. कोणी कोणासोबत लढायचे, हे स्थानिक कार्यकर्त्यांना ठरवू द्या. आम्ही मुंबईतील स्थानिक कार्यकर्ते आहोत. त्यामुळे मुंबईत स्वबळावर लढुयात, असे काँग्रेसच्या बैठकीत सांगितल्याचे भाई जगताप यांनी म्हटले.
भाई जगताप यांच्या वक्तव्यावर मनसेने उत्तर दिले आहे. त्यांचे वक्तव्य त्यांना लखलाभ असे अविनाश अभ्यंकर म्हणाले. त्यांच्याकडे कोणी हात पसरला? आमच्यासाठी राज ठाकरे जे निर्णय घेतील त्यावर आम्ही काम करू अशी भूमिका मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी मांडली
ठाकरेंच्या शिवसेनेने, भाई जगताप यांच्या वक्तव्यावर भूमिका मांडताना याआधी शिवसेना कशी वेगळी लढली याचे संदर्भ दिले, तर भाई जगताप यांनी कार्यकर्ते जे बोलले ती भूमिका मांडली अशी सारवासारव केली. माजी मुंबई काँग्रेस अध्यक्षांनी मांडलेली भूमिका थेट विद्यमान मुंबई काँग्रेस अध्यक्षांपर्यंतही पोहचली. भाई जगताप यांनी मांडलेली भूमिका ही वैयक्तिक असून पक्षाचे मत लवकरच जाहीर केले जाईल. पण काँग्रेसच्या बैठकीत आपले वेगळे अस्तित्व असावे यावर चर्चा झाली याला खासदार वर्षा गायकवाड यांनी दुजोरा दिला. मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत अधिकच्या जागा मिळायला हव्या होत्या, अशी खंतही बोलावून दाखवली.
मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आल्याने भावनिक वारे वाहत आहे. महाविकास आघाडी सोबत राज ठाकरे आले तर त्याचा फायदाच होईल अशी छुपी चर्चा आहे. पण अमराठी मतांची सांगड बांधताना काँग्रेसची तारांबळ होईल का? हा ही प्रश्न आहे. त्यात आता काँग्रेस नेत्यांचे वक्तव्य हे महाविकास आघाडी नवे राजकीय चर्चेचं वलय तयार करत आहे.