Thursday, October 23, 2025
Happy Diwali

वरळी कोळीवाड्याची किनारपट्टी होणार चकाचक, दिवसाला किती खर्च होतो माहीत आहे का?

वरळी कोळीवाड्याची किनारपट्टी होणार चकाचक, दिवसाला किती खर्च होतो माहीत आहे का?

मुंबई (खास प्रतिनिधी) : वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्याची स्वच्छता राखण्याकरता यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदाराची मुदत संपुष्टात आल्याने आता महापालिकेच्यावतीने पुढील एक वर्षांकरता कंत्राटदाराची निवड केली आहे. वरळी चौपाटीचा सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीची दैनंदिन स्वच्छता केली जाणार आहे. एक वर्षाकरता सुमारे दीड कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे वरळी कोळीवाडा किनारपट्टीचा परिसर चकाचक राखला जाणार असून यासाठी दिवसाला ३८ हजारांचा खर्च केला जाणार आहे.

मुंबईतील बहुतेक समुद्र किनारे ही प्रमुख पर्यटन स्थळे असले तरीही काही समुद्र किना-यांवर मासेमारी व्यवसाय आजही प्रामुख्याने करण्यात येतो. या वरळी समुद्र किना-यांच्या स्वच्छतेची जबाबदारी महानगरपालिकेवर सोपविण्यात आली आहे. या किनारप‌ट्टीवर मासेमारी व्यवसाय, समुद्र किना-यावर पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांमुळे कच-याचे प्रमाण वाढत असते. त्याच बरोबर समुद्राच्या लाटामार्फत येणाऱ्या तरंगता कचरा समुद्र किनाऱ्यावर जमा होत असतो. त्यामुळे या समुद्र किनाऱ्याची साफ सफाई वेळोवेळी करणे गरजेचे असते. महापालिकेच्या जी/दक्षिण विभागातील वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्याची लांबी ३.५ कि.मी. आणि ३०० मीटर आहे. या समुद्र किना-यावर जमा होणाऱ्या कचऱ्यामध्ये मुख्य करून गाळ, माती, डेब्रीज मिश्रीत कचरा इत्यादीचे प्रमाण वाढल्याने याठिकाणी जमा होणाऱ्या कचऱ्याची दैनंदिन साफसफाई करावी लागते. हा कचरा मनुष्यबळ, स्कीड स्टीयर लोडर मशीन व ई-ऑटो वाहनांद्वारे जमा करून पुढील विल्हेवाट लावण्याकरिता डम्पिंग ग्राऊंड येथे वाहुन नेण्यात येतो.

यासाठी महापालिकेच्यावतीने नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदाराचा कालावधी संपुष्टात आल्या महापालिकेच्यावतीने नव्याने निविदा मागवत कंत्राटदाराची निवड केली आहे. यामध्ये एशियन ट्रेडर्स कंपनीची निवड करण्यात आली असून एक वर्षाच्या कालावधीकरता विविध करांसह १ कोटी ४४ लाख रुपये २७ हजर रुपये खर्च केले जाणार आहेत. मागील वर्षी या चौपाटीवरील सफाईच्या कामासाठी एक दिवसाचा खर्च हा ३८ हजार ५० रुपये एवढा होता, तर आता एका दिवसाचा खर्च केवळ ४३ रुपयांनी कमी झाला आहे. यावेळेस तो ३८ हजार ७ रुपये एवढा आकारण्यात आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >