Thursday, October 23, 2025
Happy Diwali

‘संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवी ओळख’

‘संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवी ओळख’

नागपूर : सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस ही भारतातील अग्रगण्य उत्पादक कंपनी नागपूर येथे विस्तार करीत आहे. या अत्याधुनिक संरक्षण व एरोस्पेस उत्पादन प्रकल्पासाठी अटी व शर्तीनुसार मिहानतर्फे २२३ एकर जागेचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

रामगिरी निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात मिहान प्रकल्पातील वैशिष्ट्यपूर्ण ठरणाऱ्या या प्रकल्पासाठी जमिनीचे हस्तांतरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सोलार कंपनीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांना करण्यात आले. याप्रसंगी सोलार ग्रुपचे संचालक मनीष नुवाल, राघव नुवाल, सोलारचे वरिष्ठ अधिकारी जे. एफ. साळवे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे सह व्यवस्थापकीय संचालक तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, वरिष्ठ व्यवस्थापक गौरव उपश्याम, संजय इंगळे आदी उपस्थित होते.

सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसच्या या नव्या विस्तारित प्रकल्पामुळे नागपूरला देशातील प्रमुख संरक्षण व एरोस्पेस उत्पादन केंद्र म्हणून नवी ओळख प्राप्त होणार असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. हा उपक्रम महाराष्ट्राच्या ‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ आणि औद्योगिक प्रगतीच्या विकासासाठी अधिक बळकटी देणारा असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राच्या विकासासाठी शासनाने घेतलेल्या गुंतवणूकदार-अनुकूल धोरणांचा व अग्रगण्य उद्योगांचा वाढता विश्वास यावरून अधोरेखित होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनी भारतात संरक्षण क्षेत्रात सुमारे १२ हजार ८० कोटींची गुंतवणूक करत आहे. नागपूर येथे यातील ६८० कोटी रुपयांची गुंतवणूक करून हा प्रकल्प मिहान मधील विशेष आर्थिक क्षेत्रात साकारला जात आहे. या प्रकल्पामुळे सुमारे ४०० प्रत्यक्ष रोजगार निर्मिती व सुमारे एक हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. या प्रकल्पामुळे संरक्षण उत्पादन उद्योग क्षेत्रात नागपूरला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळणार असून विदर्भाच्या औद्योगिक प्रगतीत मोठी भर पडणार आहे. महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फलित असून विविध उद्योजकांना गुंतवणुकीसाठी आकर्षित करणे, प्रादेशिक रोजगारनिर्मिती वाढवणे, संरक्षण व इतर उत्पादन क्षेत्रात राज्याला अव्वल स्थानी नेणे, हे मिहानचे ध्येय असल्याचे एमएडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >