
मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिका सुरक्षा रक्षक खात्यातील रिक्तपदे वाढतच चाललेली असून आजही महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये खासगी सुरक्षा घ्यावी लागत आहे. महापालिकेच्या केईएम, शीव आणि नायर या तीन रुग्णालयांमध्येच २९५ सुरक्षा रक्षकांसह अधिकाऱ्यांची खासगी सुरक्षा कंपनीची सेवा घेतली जात आहे. त्यामुळे या तिन्ही रुग्णालयांमध्ये खासगी सुरक्षा सेवेकरता प्रत्येक महिन्याला सुमारे ८४ लाख रुपयांचा खर्च केला जात आहे. पुढील तीन वर्षांकरता महाराष्ट्र् राज्य सिक्युरिटी कॉर्पोरेशन यांच्या माध्यमातून रुग्णालयांमध्ये खासगी सुरक्षा रक्षकांची सेवा घेतली जात आहे.
मुंबई महापालिकेच्या शीव येथील सर्वसाधारण रुग्णालयात बाळ चोरीच्या घटनेनंतर उच्च न्यायालयाने सुरक्षिततेच्या दृष्टीने दिलेल्या निर्देशानुसार तसेच महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये डॉक्टर व रुग्णालयांमधील कर्मचार यांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण होवू नये यासाठी सन २०१७ पासून महाराष्ट्र सिक्युरिटी कॉर्पोरेशन या संस्थेकडून तीन सहायक सुरक्षा अधिकारी, २२ मुख्य सुरक्षा २२ सशस्त्र सुरक्षा रक्षक तसेच २४८ सुरक्षा रक्षक असे एकूण २९५ सुरक्षा कर्मचारी यांची सुरक्षा व्यवस्था महापालिकेच्या परळ केईएम, शीव आणि नायर या तिन्ही प्रमुख रुग्णालयांमध्ये पुरवण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेच्या सुरक्षा खात्यातील जवानांची ३८९० मंजूर पदे असून त्यातील २२४१ पदे आजमितीस रिक्त आहेत. तर आजमितीस केवळ १५७२ जवानांच्या जोरावर महापालिकेच्या सुरक्षेचा डोलारा सांभाळला जात आहे. याशिवाय अधिकाऱ्यांची ५० पदे असून त्यातील केवळ १० अधिकाऱ्यांची पदे कार्यरत असून उर्वरीत पदे रिक्त आहे. या सुरक्षा रक्षक खात्यातील रिक्तपदांची भरतीची २०१८ पासून चर्चा होत असून जानेवारी २०२२ पासून प्रत्यक्षात भरतीला मंजुरी मिळून पुढील प्रक्रिया सुरु झाली आहे. परंतु आज तीन वर्षे झाली तरी ही भरती बिंदू नामावलीत आणि इतर मंजुरीच्या प्रतीक्षेत अडकून पडली आहे. आता प्रशासनाच्यावतीने ८४९ रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबवली जात असली तरी अद्यापही ती लाल फितीतच अडकून पडलेली आहे.
महापालिका सुरक्षा विभागातील रिक्त पदे न भरल्याने केईएम, शीव आणि नायर या तिन्ही प्रमुख रुग्णालयांमध्ये महाराष्ट्र राज्य सिक्युरिटी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून खासगी सुरक्षा सेवा घेतली जात आहे. सन २०१७ पासून २०१९पर्यंत प्रथम प्रत्येकी एक वर्ष आणि त्यानंतर २०१९पासून त्यानंतर दोन आणि तीन वर्षांकरता या खासगी संस्थेच्या सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी नेमलेल्या संस्थेची एप्रिल २०२५ पर्यंत मुदत संपुष्टात आल्यानंतर १ मे २०२५ पासून मे २०२८ पर्यंतच्या कालावधीकरता २९५ सुरक्षा जवानांची सेवा तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये घेतली जात आहे. यासाठी मासिक सुमारे ८४ लाख रुपयांचा खर्च असून तीन वर्षांकरता ३० कोटी १२ लाख ८४ हजार रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
केईएम, शीव आणि नायर रुग्णालयातील खासगी सुरक्षा
सहायक सुरक्षा अधिकारी : ०३(वेतन : प्रत्येकी ३५ हजार)
मुख्य सुरक्षा : २२ (प्रत्येकी २९ हजार रुपये)
सशस्त्र सुरक्षा रक्षक : २२(वेतन : प्रत्येकी ३१ हजार रुपये)
सुरक्षा रक्षक : २४८(वेतन : प्रत्येकी २८ हजार रुपये)
एकूण सुरक्षा कर्मचारी: २९५