लक्सर : हरिद्वारमधील लक्सर तालुक्यातील भिक्कमपूर जीतपूर गावात दिवाळीच्या रात्री घडलेल्या अमानुष घटनेने परिसर हादरला आहे. फटाक्यांच्या आवाजामुळे संतप्त झालेल्या एका व्यक्तीने खेळत असलेल्या मुलांवर अॅसिड फेकले. या अॅसिड हल्ल्यात ५ जण जखमी झाले असून एका मुलाची प्रकृती गंभीर आहे.
मंगळवारी रात्री ९ वाजता १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांचा एक गट गावात फटाके फोडत होता. त्याच परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने मुलांना फटाके फोडण्यास मनाई केली. मात्र मुलांनी त्याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे संतापलेल्या व्यक्तीने आपल्या घराच्या छतावरून अॅसिडचा डबा थेट त्यांच्या दिशेने फेकला. अॅसिड मुलांवर उडाल्याने ते भाजले आणि परिसरात क्षणात गोंधळ उडाला.
या घटनेत शेरसिंग यांचे मुलगे राहुल आणि दीपक, बहादूर यांचा मुलगा सौरभ, बालेश यांचा मुलगा पंकज, आणि लाहोरसिंग यांचा मुलगा विशाल हे जखमी झाले. तातडीने ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. चार मुलांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले, तर सौरभ हा सुमारे ५० टक्के भाजल्याने त्याला मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले.
घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आरोपी व्यक्तीला पकडून त्याला मारहाण केली आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस महानिरीक्षक राजीव रौथन यांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, गावात तणावाचे वातावरण आहे.