Thursday, October 23, 2025
Happy Diwali

"मला कधी लग्न करायचं नव्हतं पण..." पॉलाच्या एका मेसेजनं बदललं सारंगचं आयुष्य

पुणे : भारतीय डिजिटल पार्टी (भाडिपा) या लोकप्रिय मराठी यू ट्यूब चॅनलचा संस्थापक आणि अभिनेता सारंग साठे याने त्याची प्रेयसी पॉला हिच्याशी २८ सप्टेंबर रोजी लग्नगाठ बांधली. अनेक वर्षांपासून एकत्र असलेल्या या जोडप्याने आतापर्यंत एक कागद आमचं नातं ठरवू शकत नाही अशी भूमिका घेत लग्न न करता प्रेमाने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अखेर त्यांनी साधेपणाने विवाह केला आणि यामागचं कारण त्यांनी स्वतः स्पष्ट केलं आहे.

भाडिपाच्या यू ट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये पॉला आणि सारंग यांनी त्यांच्या या निर्णयामागील भावनिक प्रसंग उघड केला. पॉलाने सांगितले की, साधारण वर्षभरापूर्वी पॅरिसहून मुंबईला येताना तिचं विमान इराकजवळ आलं होतं. यानंतर विमान वळविण्याचा निर्णय झाला. पायलटने जाहीर केलं की इराणने इस्त्रायलवर हल्ला केला असून पुढे जाणं शक्य नाही. या घटनेमुळे ती घाबरली आणि सारंगला काहीही झालं तरी मी तुझ्यावर प्रेम करते असा मेसेज पाठवला.

त्या क्षणी पॉलाला जाणवलं की, आयुष्यात काहीही घडू शकतं आणि आपल्याला आवडत्या व्यक्तीसोबत आयुष्याचं पुढचं पाऊल टाकायला हवं. त्यामुळेच तिने सारंगसमोर लग्नाची इच्छा व्यक्त केली. पॉलाची भावनिक अवस्था पाहून सारंगनेही तत्काळ लग्नाचा निर्णय घेतला.

दोघांनीही अत्यंत साधेपणाने विवाह केला. नंतर भाडिपा टीमने ऑफिसमध्येच मराठमोळ्या पद्धतीने छोटेखानी समारंभ आयोजित करून त्यांना सरप्राइज दिलं. या विवाहाबद्दल चाहत्यांकडून आणि सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >