Thursday, October 23, 2025
Happy Diwali

Megha Dhade : उद्धव सेनेच्या पायाखालची जमीन...महेश कोठारेंच्या 'मोदी भक्ती'वर टीका करणाऱ्यांना प्रसिद्ध अभिनेत्रीचा सणसणीत प्रत्युत्तर!

Megha Dhade : उद्धव सेनेच्या पायाखालची जमीन...महेश कोठारेंच्या 'मोदी भक्ती'वर टीका करणाऱ्यांना प्रसिद्ध अभिनेत्रीचा सणसणीत प्रत्युत्तर!

मुंबई : दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी दिवाळी पाहाट कार्यक्रमादरम्यान “मी भाजप भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे” असे जाहीर वक्तव्य केल्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या या विधानानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी टीका करताना म्हटले होते की, अपघात प्रकरणात सूनबाई अडकल्या असल्यामुळे ते 'अशी मुक्ताफळं उधळत आहेत'. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तर "महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना? मला शंका वाटते," असा खोचक टोला लगावला होता. या वादात आता अभिनेत्री आणि 'बिग बॉस मराठी'ची विजेती मेघा धाडे (Megha Dhade) हिने उडी घेतली आहे. मेघा धाडेने महेश कोठारे यांची बाजू घेत त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक भलीमोठी पोस्ट लिहून कोठारेंच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

'मोदी भक्ती'वर टीका करणाऱ्या उद्धव सेनेला मेघा धाडेचा इन्स्टावरून सणसणीत उत्तर

अभिनेते महेश कोठारे यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केल्यानंतर त्यांच्यावर टीका करणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला अभिनेत्री मेघा धाडे (Megha Dhade) हिने इन्स्टाग्रामवरील एका लांबलचक पोस्टद्वारे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मेघा धाडेने आपल्या पोस्टमध्ये व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला. तिने लिहिले की, "अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने जेव्हा उद्धव सेना जॉईन केली, तेव्हा कोणत्याही भाजप प्रवक्त्याने तिच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आक्षेप घेतला नाही. तसेच, सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी तर मनसेच्या तिकिटावर लोकसभा लढवली, तरी कोणी आक्षेप घेतला नाही." परंतु, "महेश कोठारेंनी मोदींची तारीफ केली की उद्धव सेनेला इंगळ्या डसल्या आणि त्यांच्या मराठीपणावर देखील शंका घेण्यात आली," अशा शब्दांत तिने टीकाकारांना सुनावले. कोठारे यांनी मनापासून मत व्यक्त केल्यामुळे ही टीका होत असल्याचे मेघा धाडेने सांगितले. ती म्हणाली, "कोठारे जे बोलले ते मनापासून बोलले. कोणत्या तिकिटाच्या लालसेपोटी किंवा कोणाचे पाकीट मिळवण्यासाठी ते असे बोलले नाहीत." कोठारेंच्या भाषणात 'सामान्य मुंबईकरांची भावना' होती, जो मुंबईकर आधी रस्त्यावर धक्के खायचा, तो आता मेट्रोमधून गार वाऱ्यात प्रवास करतोय; जो ट्रॅफिकमध्ये अडकायचा, तो आता अटल सेतूवरून सुसाट धावतोय. मेघा धाडेने दावा केला की, "त्या मुंबईकरांच्या भावनांचे प्रगटीकरण कोठारेंच्या भाषणात झाले आणि म्हणूनच उद्धव सेनेच्या पायाखालची जमीन सरकली!" मेघा धाडेने शेवटी महेश कोठारे यांना सल्ला दिला की, त्यांनी टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे. ती म्हणाली, “तुम्ही जे बोललात ते तुमचे मत होते. आम्हा सगळ्यांना तुमच्या मताचा शंभर टक्के आदर आहे. कारण ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है कहना. छोडो बेकार की बातो को, हमे तो सच के साथ ही हैना’,” असे कॅप्शन देऊन तिने कोठारेंना पाठिंबा दर्शविला.

नेमके काय घडले?

दिवाळी पहाट कार्यक्रमात महेश कोठारे यांनी दिली 'मोदी भक्ती'ची कबुली

ज्येष्ठ अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल एका जाहीर कार्यक्रमात स्पष्टपणे मत व्यक्त केल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. बोरिवली (Borivali) येथे आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात महेश कोठारे यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोणत्याही प्रकारची भीड न बाळगता आपले मत मांडले. ते म्हणाले, “मी भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे.” यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांच्या प्रचारादरम्यान केलेल्या विधानाचाही संदर्भ दिला. “जेव्हा मी पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आलो होतो, तेव्हा मी म्हटलं होतं की..." ते खासदार निवडून देत नाहीत तर मंत्री निवडून देत आहेत. आता जर या विभागातून नगरसेवक नसेल तर महापौर निवडला जाईल.”

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा