Friday, November 14, 2025

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणात सरासरी ११.१ टक्के वाढ

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणात सरासरी ११.१ टक्के वाढ

ठाणे : नागरिकांनी याही वर्षी दिवाळी सण उत्साहाने साजरा केला असून याकाळात फटाके वाजण्याच्या प्रमाणातही वाढ झालेली आहे. मात्र, संध्याकाळच्यावेळी झालेल्या पावसामुळे तेवढ्या काळात प्रदूषणापासून काहीसा दिलासा मिळाला. अर्थात, यंदा दिवाळीपूर्वीची हवेची गुणवत्ता आणि दिवाळीच्या काळातील हवेची गुणवत्ता याचा विचार करता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणाच्या पातळीत सरासरी ११.१ टक्के वाढ नोंदवण्यात आली. तर, दिवाळीच्या कालावधीत ध्वनीच्या पातळीत ३.२ टक्के वाढ नोंदली गेली आहे.

सन २०२४च्या दिवाळी कालावधीतील हवेच्या गुणवत्तेशी तुलना केली असता यंदा हवेतील प्रदूषणाच्या पातळीत ७.२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील ३ वर्षाच्या दिवाळीच्या कालावधीतील वायू प्रदूषणाचे मूल्यमापन केले असता असे निदर्शनास येते की, सन २०२३ मध्ये दिवाळी कालावधील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) मध्ये ६२.६ टक्के इतकी वाढ झाली. सन २०२४मध्ये दिवाळी कालावधीत निर्देशांकात ३३.९ टक्के वाढ झाली होती.

*हरित फटाकेच वाजवायला हवेत – मनीषा प्रधान*

यंदा पावसामुळे प्रदूषणाच्या सरासरी प्रमाणात काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र दिसत असले तरी पाऊस थांबल्यानंतर धुलिकणात अचानक मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही धोकादायक स्थिती आहे. त्यावर मात करण्यासाठी केवळ हरित फटाक्यांकडे आपला कल नेणे ही काळाची गरज आहे. पावसामुळे ठाण्यातील सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम पातळीवरच राहिला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणामध्ये सरासरी ११.१ टक्के वाढ नोंदली गेली, असे ठाणे महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितले.

*हवा गुणवत्तेचा तुलनात्मक अभ्यास*

महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने ठाणे शहरात दिवाळी २०२५ कालावधीतील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास केला. मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली उप पर्यावरण अधिकारी विद्या सावंत आणि ज्युनिअर केमिस्ट ओमसत्याशिव परळकर यांनी हा अभ्यास केला. या अभ्यासात, दिपावली पूर्व व दिपावली कालावधीत (लक्ष्मीपूजन) ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता तपासण्यात आली. त्यानुसार दिनांक ११.१०.२०२५ रोजी दिपावली पूर्व कालावधीत हवेतील धुलिकणांचे प्रमाण १४३ ug / m 3 हवेतील NOx चे प्रमाण ३१ ug /m 3 तर SO2 चे प्रमाण १३ ug / m3 इतके आढळले असून त्यानुसार हवा गुणवत्ता निर्देशांक १४१ इतका होता.

तर, दिनांक २१.१०.२०२५ रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेतील धुलिकणांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच १३९ ug /m3 इतके आढळून आले. तसेच, या दिवशी हवेतील NOx चे प्रमाण ३० ug /m 3 तर SO2 चे प्रमाण १७ ug / m 3 इतके आढळले असून त्यानुसार हवा गुणवत्ता निर्देशांक १५७ इतका होता.

दिवाळीच्या कालावधीत ध्वनीच्या पातळीत ३.२ टक्के वाढ नोंदली गेली आहे. गतवर्षी हे प्रमाण ८६ एलमॅक्स एवढे होते. तर, यंदा ८९.२ एलमॅक्स एवढे प्रमाण नोंदले गेले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >