
मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी वारंवार होऊ लागल्यास त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. गरम पेये जसे की चहा किंवा कॉफी पिताना तोंड भाजणे, दात घासताना जिभेवर चुकून लागणे या कारणांनी तोंडात जखमा होऊ शकतात. पण जर कोणतीही बाह्य दुखापत न होता तोंड वारंवार येत असेल, तर हे आरोग्याच्या इतर समस्यांचे संकेत असू शकते.
जाणून घ्या तोंड येण्यामागील कारणे आणि त्यावरचे घरगुती उपाय:
तोंड येण्यामागची प्रमुख कारणे
रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यास संक्रमण होण्याची शक्यता वाढते. यामुळे तोंड येण्याचे प्रमाण वाढू शकते.
हार्मोन्समधील चढ-उतार महिलांमध्ये मासिक पाळी दरम्यान हार्मोनल बदल होतात. त्यामुळे या काळात तोंड येण्याची समस्या जाणवते.
व्हिटॅमिन्सची कमतरता व्हिटॅमिन B12, आयर्न आणि फॉलिक अॅसिडच्या कमतरतेमुळे तोंडात वारंवार फोड येतात.
पचनतंत्रातील बिघाड अपचन, बद्धकोष्ठता किंवा आंतड्यांचे विकार असलेल्या व्यक्तींमध्ये तोंड येण्याची समस्या अधिक दिसून येते.
संसर्ग आणि अॅलर्जी दूषित पाणी पिणे, बॅक्टेरिया किंवा व्हायरल संसर्ग, तसेच काही अॅलर्जीक पदार्थ खाल्ल्यामुळेही तोंडात फोड येऊ शकतात.
धूम्रपान आणि तंबाखू सेवन तंबाखूजन्य पदार्थांचा वापर तोंडाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करतो. धूम्रपानामुळे तोंड येणे आणि कधीकधी अल्सर होण्याची शक्यता असते.
तोंड येण्यावर घरगुती आणि नैसर्गिक उपाय
कोरफडीचा उपयोग कोरफड (अॅलोवेरा) मध्ये थंडावा देणारे गुणधर्म असतात. कोरफडीचा रस प्यायल्याने तोंडातले फोड लवकर बरे होतात.
लिकोरिस पावडर आणि मध गुळवेल किंवा लिकोरिस पावडर मधात मिसळून घेणे तोंडाच्या अल्सरसाठी प्रभावी ठरते.
पुरेसे पाणी पिणे शरीरातील उष्णता कमी ठेवण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्या. हायड्रेटेड राहिल्यामुळे तोंड येण्याचे प्रमाण कमी होते.
हळद पाण्याने गुळण्या कोमट पाण्यात हळद टाकून गुळण्या केल्याने तोंडातील सूज आणि वेदना कमी होतात. हळदीचे अॅंटीसेप्टिक गुण फायदेशीर ठरतात.
तोंड येणे ही एक साधी वाटणारी पण त्रासदायक समस्या असू शकते. ही समस्या वारंवार होत असल्यास, ती केवळ घरगुती उपायांवर सोडवण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरेल. योग्य आहार, पचनसंस्थेची काळजी आणि स्वच्छता पाळल्यास या समस्येपासून दूर राहता येईल.