
केरळ : केरळमधील पथनमथिट्टा जिल्ह्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगवेळी एक मोठा अपघात थोडक्यात टळला. प्रमादोम स्टेडियममध्ये तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरल्यावर त्या ठिकाणी काँक्रीटचा एक भाग खचला आणि मोठा खड्डा तयार झाला. या घटनेने सुरक्षा यंत्रणांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
सुदैवाने, त्या वेळी राष्ट्रपती हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. तातडीने पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी हस्तक्षेप करत हेलिकॉप्टर सुरक्षितपणे त्या ठिकाणाहून बाहेर काढले.
प्रमादोम स्टेडियममध्ये हेलिपॅड तातडीने बांधण्यात आले होते. आधी निलक्कल येथे लँडिंगचे नियोजन होते, मात्र खराब हवामानामुळे जागा बदलण्यात आली. परिणामी, मंगळवारी रात्रीच हेलिपॅडचे काम पूर्ण करण्यात आले होते. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, काँक्रीट योग्य प्रकारे न सुकल्याने ते हेलिकॉप्टरचे वजन सहन करू शकले नाही आणि जमिनीत खड्डा पडला.
या तांत्रिक अडथळ्यानंतरही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दौरा पुढे सुरु राहिला. त्यांनी सबरीमाला मंदिरात दर्शन घेतले आणि आरतीसही सहभागी झाल्या. पुढील कार्यक्रमानुसार त्या २३ ऑक्टोबर रोजी तिरुवनंतपुरम येथे माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील आणि शिवगिरी मठात श्री नारायण गुरू यांच्या महासमाधी शताब्दी समारंभाचे उद्घाटन करतील. २४ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती एर्नाकुलम येथील सेंट टेरेसा कॉलेजच्या शताब्दी समारंभात उपस्थित राहणार आहेत.