नवी दिल्ली : गायक आणि अभिनेता ऋषभ टंडन (३५) याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पापाराझी (सेलिब्रेटींचा पाठलाग करुन त्यांच्याविषयीची बित्तंबातमी मिळवणारे) विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन ही माहिती दिली.
प्राथमिक वृत्तानुसार, ऋषभ टंडन त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी दिल्ली येथे आला होता. दिल्लीतच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचे निधन झाले. ऋषभ करिअरसाठी मुंबईत वास्तव्यास होता. शांत आणि मनमिळाऊ स्वभावामुळे तो लोकप्रिय झाला होता. संगीत क्षेत्रात तो स्वतःचे स्थान निर्माण करत होता. अभिनयाच्या क्षेत्रात 'फकीर - लिविंग लिमिटलेस' आणि 'रशना: द रे ऑफ लाईट' या चित्रपटांमध्ये त्याने केलेल्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते.
ऋषभ टंडनला त्याच्या 'फकीर' या गाण्याने लोकप्रियता मिळवून दिली. त्याच्या लोकप्रिय गाण्यांमध्ये 'ये आशिकी' , 'चांद तू', 'धू धू कर के', आणि 'फकीर की जुबानी' यांचा समावेश आहे. आणखी काही गाणी प्रदर्शित व्हायची आहेत. पण आधीच ऋषभचा मृत्यू झाला. यामुळे ते काम आता अपूर्णच राहणार आहे.