
मुंबई: क्रिकेट विश्वातील एकदिवसीय महिला विश्वचषकच्या यावर्षीच्या स्पर्धेत आतापर्यंत २२ सामने पार पडले आहेत. हा २२वा सामना दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात पार पडल्यानंतर गुणतालिकेतील चित्र बदलले असून स्पर्धेतून पाकिस्तान आणि बांग्लादेश हे दोन संघ बाद झाले आहेत. त्यामुळे उपांत्य फेरीच्या एका जागेसाठी आता तीन संघात चुरस रंगणार आहे. ज्यात भारतीय महिलांचा संघदेखील सहभागी आहे.
उपांत्य फेरीसाठी ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंडने आपली जागा पक्की केली आहे. आता उपांत्य फेरीसाठी केवळ एक जागा शिल्लक असून त्यावर भारत, न्युझीलंड आणि श्रीलंका यांच्यात एका जागेसाठी जोरदार लढत होणार आहे. भारताचे अजून दोन सामने शिल्लक आहे. जर भारताने दोनही सामने जिंकले तर भारतीय संघ उपांत्य फेरीत जागा निर्माण करू शकतो.
उपांत्य फेरीसाठी भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना होणार आहे. या सामन्यात जर भारताने न्यूझीलंडचा पराभव केला तर उपांत्य फेरीत भारताचे स्थान निश्चित होईल. अन्यथा बांग्लादेशसोबतच्या सामन्यात भारताला विजय मिळवणे अनिवार्य असेल. भारताने जर बांग्लादेशसोबत विजय मिळवला तर न्यूझीलंडसमोर इंग्लंडचे आव्हान उभे राहणार आहे. ज्यात न्यूझीलंडची हार झाली तर भारतीय संघाला उपांत्य फेरीत जाण्यापासून कोणी रोखू शकणार नाही.