
मुंबई: सध्या दिवाळीच्या धामधुमीत फटाक्यांमुळे होणाऱ्या दुर्घटनांची संख्या वाढताना दिसत आहे. अशातच एक मोठी आणि धक्कादायक घटना मुंबईतील अंधेरी परिसरात घडली. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) खासदार रवींद्र वायकर हे राहत असलेल्या एका गगनचुंबी इमारतीच्या २२ व्या मजल्यावर आग लागल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, दिवाळीत उडवलेल्या 'रॉकेट' फटाक्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
आग विझवण्यासाठी गेले तर फायर सिस्टीममध्ये पाणीच नव्हते!
ही दुर्घटना घडताच खासदार वायकर यांनी स्वतः तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्यासाठी मदतकार्य सुरू केले. मात्र, याच वेळी त्यांना इमारतीच्या अग्निशमन प्रणालीत (Fire System) पाणीच उपलब्ध नसल्याचे समजले. या मोठ्या त्रुटीमुळे वायकर यांनी घटनास्थळीच तीव्र संताप व्यक्त केला.
या घटनेनंतर रवींद्र वायकर यांनी थेट मुंबई महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले. "जर नव्याने बांधलेल्या इमारतींची फायर सिस्टीमच काम करत नसेल, तर मुंबईतील जुन्या इमारतींची अवस्था काय असेल?" असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्यांनी मुंबईतील प्रत्येक इमारतीच्या फायर सिस्टीमची कसून तपासणी करण्याची आणि त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.
घातक फटाक्यांवर बंदीसाठी लोकसभेत मुद्दा मांडणार
यावर्षी दिवाळीत मुंबईत रॉकेट फटाक्यांमुळे उंच इमारतींना धोका निर्माण झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार रवींद्र वायकर यांनी रॉकेटसारख्या धोकादायक फटाक्यांवर बंदी घालण्यासाठी लोकसभेत मुद्दा मांडणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यांनी नागरिकांना भावनिक आवाहन केले आहे की, रॉकेटसारखे फटाके इमारतींच्या दिशेने सोडू नका आणि आपली दिवाळी शांततेत तसेच सुरक्षितपणे साजरी करा.