Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

दहा महिन्यांमध्ये गॅस सिलिंडर स्फोटांच्या ४७ दुघर्टना... एवढ्यांचे बळी, एवढे झाले जखमी

दहा महिन्यांमध्ये गॅस सिलिंडर स्फोटांच्या ४७ दुघर्टना... एवढ्यांचे बळी, एवढे झाले जखमी

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईमध्ये सध्या आगीच्या दुघर्टनांमध्ये वाढत होत असून यामध्ये प्राधान्य क्रम हा सदोष विद्युततारांमुळे घटनांचा असला तरी त्याखालोखाल घरगुती आणि कमर्शियल वापराच्या गॅस सिलिंडरमुळे लागलेल्या आगींची संख्याही लक्षणीय आहे. या जानेवारीपासून १५ ऑक्टोबर या कालावधीतच मुंबईत गॅस सिलिंडर स्फोटापासून लागलेल्या आगींची संख्या ४७ एवढी आहे. या सर्व दुघर्टनांमध्ये १८ जण जखमी आणि ०९ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर येत आहे. यासर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सुरक्षिततेदृष्टीकोनातून मुंबई अग्निशमन दलाकडून जनजागृती करण्यात येत असली तरी नागरिकांकडून गॅस सिलिंडर वापरासंदर्भातच दुर्लक्ष केला जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

सिलिंडर स्फोटाच्या दुघर्टनांमध्ये गॅस गळती हेच प्रमुख कारण पुढे आले असून जानेवारीपासून घडलेल्या ४७ दुघर्टनांमध्ये अनेक निष्पाप लोकांचे जीव जावून कुटुंबांचे आणि मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.

जानेवारी ते ऑक्टोबर २०२५मधील गॅस सिलेंडर स्फोटांच्या दुघर्टना

महिना ------ --दुघर्टना----- जखमी संख्या ----मृत संख्या

जानेवारी --------०९ ------------- ०४-------------००

फेब्रुवारी --------०६-------------- ००-----------००

मार्च ------------०८------------- ००-----------००

एप्रिल -----------०२------------- ००------------००

मे --------------०४-------------- ००------------००

जून -----------०२ ------------ ०१------------- ००

जुलै---------- ०४------------ ०७------------- ०२

ऑगस्ट ------ ०२----------- ०० ---------------००

सप्टेंबर -------०९----------- ०६ ----------------०६

ऑक्टोबर----- ०१----------- ००---------------- ००

सिलिंडर स्फोटामुळे आजवर झालेल्या मोठ्या दुघर्टना

  1. कांदिवलीत एका कॅटरिंग युनिटमध्ये सिलिंडर स्फोटा ३ महिलांचा होरपळून मृत्यू, ४ जण जखमी धारावीत सिलिंडर स्फोटामुळे ५ जणांचा मृत्यू आणि १७ जण जखमी
  2. लालबागमधील लग्न कार्याच्या झालेल्या सिलिंडर स्फोटात एकूण ९ जणांचा मृत्यू, १६जण जखमी
  3. वांद्रे येथे गॅस सिलिंडर स्फोटामुळे दुमजली घर कोसळून १५ जण जखमी
  4. माहिम येथील फूड स्टोअरमध्ये झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू ०८ जण जखमी.

गॅस सिलिंडर स्फोटाची काय आहेत कारणे

  1. गॅस पाईप किंवा नळी (Hose Pipe) जुनी होणे किंवा खराब होणे.
  2. रेग्युलेटरमध्ये बिघाड.
  3. गॅसची गळती होत असतानाही दुर्लक्ष करणे किंवा त्वरित उपाययोजना न करणे.
  4. सुरक्षिततेचे नियम न पाळता व्यावसायिक वापर करणे.
  5. चाळी किंवा अरुंद जागेत योग्य हवा जायला जागा नसताना गॅस गळती होणे.

काय काळजी घ्यावी? (सुरक्षिततेसाठी उपाययोजना)

  1. सुरक्षिततेच्या उपाययोजनांसाठी कशी घ्याल काळजी
  2. गळती तपासणी: गॅसचा वास आल्यास, त्वरित गॅसचा रेग्युलेटर बंद करा.
  3. वायुविजन (Ventilation): गॅसचा वास येत असल्यास, घरातील आणि स्वयंपाकघरातील खिडक्या, दरवाजे लगेच उघडा. हवा खेळती ठेवा.
  4. वीज उपकरणे टाळा: गॅस गळतीची शंका असल्यास, विजेचे दिवे, पंखे किंवा कोणतेही विद्युत उपकरण चालू किंवा बंद करू नका. यामुळे ठिणगी पडून स्फोट होऊ शकतो.
  5. माचिस/लायटरचा वापर नको: गॅस गळती तपासण्यासाठी चुकूनही आगपेटीतील काडी किंवा लायटर वापरू नका.
  6. लगेच संपर्क साधा: गॅस वितरक कंपनीच्या (Distributor) आपत्कालीन क्रमांकावर किंवा अग्निशमन दलाशी (101) तातडीने संपर्क साधा.
  7. सुरक्षित उपकरणे: गॅस नळी (Hose Pipe) आणि रेग्युलेटर हे प्रमाणित (ISI Mark) आणि चांगल्या गुणवत्तेचे असावेत, तसेच ते कंपनीने ठरवून दिलेल्या कालावधीत बदलावेत.
  8. योग्य जागा: सिलिंडर नेहमी सरळ आणि हवेशीर जागी ठेवावा.
  9. व्यावसायिक वापर: व्यावसायिक कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या सिलिंडरसाठी आवश्यक असलेले सर्व सुरक्षा नियम आणि मानके काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे.
Comments
Add Comment