Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

आयटीआयमध्ये ‘वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट’ अभ्यासक्रम

आयटीआयमध्ये ‘वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट’ अभ्यासक्रम

तीर्थक्षेत्रात उपलब्ध होणार प्रशिक्षित मनुष्यबळ

मुंबई  : आयटीआयमध्ये सुरू होणाऱ्या ‘वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट’ या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार असून पुढच्या वर्षी नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात हजारो प्रशिक्षित युवक भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत राहणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. या अभ्यासक्रमाच्या माहितीबाबत ते सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकारांशी बोलत होते.

व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था (आयटीआय)तर्फे ‘वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट’ हा विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून, या उपक्रमाला राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा (National Skill Qualification Framework – NSQF) यांची मान्यता मिळाली आहे. या अभ्यासक्रमाच्या निमित्ताने तीर्थक्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. धार्मिक मेळ्यांमध्ये, यात्रांमध्ये आणि तीर्थक्षेत्रांवर कार्य करणाऱ्या युवकांना या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेले युवक भाविकांचे स्वागत, मार्गदर्शन, आरोग्य व स्वच्छता जनजागृती तसेच सामाजिक समन्वय या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. त्याचबरोबर २०२६–२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, लाखो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात शिस्तबद्ध व्यवस्थापन व सेवा पुरवण्यासाठी या अभिनव उपक्रम द्वारे कुंभमेळ्यातील भाविकांना सेवा-प्रदान करण्यासाठी अतिशय मोलाचे साहाय्य होणार असल्याची माहितीही मंत्री लोढा यांनी यावेळी दिली.

विशेष म्हणजे अल्पमुदतीच्या अभ्यासक्रम कार्यक्रमांतर्गत ‘वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट’ हा अभ्यासक्रम नाशिक जिल्ह्यात घेण्यात येणार असून कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांचे व्यवस्थापन, मार्गदर्शन आणि सेवा कार्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणे हा यामागचा उद्देश आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातील विविध भागात अशा स्वरूपाचे अभ्यासक्रम चालवले जात असल्याची माहिती कौशल्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

Comments
Add Comment