Tuesday, November 11, 2025

ऐन दिवाळीत हापूसची पहिली पेटी देवगडहून दाखल

ऐन दिवाळीत हापूसची  पहिली पेटी देवगडहून दाखल

लक्ष्मीपूजनाच्या मुहुर्तावर वाशीत विक्रीला सुरुवात

देवगड  : देवगड तालुक्यातील पडवणे येथील आंबा बागायतदार प्रकाश धोंडू शिर्सेकर यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ६ डझन हापूस आंब्यांची पेटी मुंबई येथील वाशी मार्केटला रवाना केली. या वर्षीच्या मोसमी हापूस आंब्यांच्या विक्रीचा प्रारंभ या पेटीद्वारे झाला असून, हापूसच्या पहिल्या पेटीचा मान शिर्सेकर यांना मिळाला आहे.

पडवणे गावातील शिर्सेकर यांच्या बागेत जुलै महिन्यात तीन ते चार कलमांना आगाऊ मोहोर आला होता. त्यातील दोन कलमांवरील मोहराचे त्यांनी प्लास्टिक आवरण घालून संरक्षण केले होते. योग्य काळजी व फवारणीमुळे त्या कलमांवर सुमारे पाच पेट्यांइतकी फळधारणा झाली. त्यापैकी पहिली पेटी त्यांनी २० ऑक्टोबर रोजी वाशी मार्केटकडे रवाना केली. वाशी येथील नानाभाऊ जेजुरकर अँड कंपनी या दलालामार्फत ही आंबापेटी विक्रीस ठेवली जाणार असून, विक्री लक्ष्मीपूजनाच्या दिवशी होणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आंबा पेटी विक्रीस ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. या आधीही, सुमारे पाच वर्षांपूर्वी नोव्हेंबर महिन्यात शिर्सेकर यांनी हापूस पेटी वाशी मार्केटला पाठवण्याचा मान मिळवला होता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >