
कर्तृत्ववान ती राज्ञी : ‘पद्मश्री नयनाताई अपटे-जोशी’
भारतीय कला-संस्कृतीचा पट जितका रंगीबेरंगी आहे, तितकाच त्याला व्यक्त करणाऱ्या कलाकारांचा इतिहासही विलक्षण आहे. त्या तेजस्वी कलाकारांपैकी एक नाव म्हणजे ‘पद्मश्री नयनाताई अपटे-जोशी’ ७० वर्षांहून अधिक काळापासून अभिनय, संगीत आणि रंगभूमीच्या सेवेत कार्यरत असलेली ही अभिनेत्री म्हणजे मराठी नाट्यविश्वाची तेजस्वी दीपस्तंभ आहे. चला तर मग आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या देदीप्यमान कर्तृत्वाचा लखलखता प्रवास जाणून घेऊया. नयनाताई आपटे या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि गायिका शांताबाई आपटे यांच्या कन्या. सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेल्या पुणे येथे त्यांचा जन्म झाला. बालपणापासूनच संगीताची आणि रंगभूमीची गोडी त्यांच्या रक्तात होती. आईकडून मिळालेले संस्कार आणि परंपरा पुढे त्यांनी अधिक तेजाने जोपासली.
नयनाताईंचे बालपण एका संस्कारी, कलाप्रेमी वातावरणात गेले. त्यांच्या आई शांता आपटे या १९३०-४० च्या दशकातील मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री व गायिका होत्या. त्यामुळे घरात रोज गाण्यांचे आणि नाट्यसंवादांचे सूर गुंजत असत. बालपणातच त्यांनी रंगमंचावरच्या प्रत्येक हालचालीकडे कुतूहलाने निरीक्षण केले. वयाच्या चौथ्या आणि पाचव्या वर्षीच त्यांनी संगीत आणि नृत्य शिकण्यास सुरुवात केली. त्यांना शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण त्यांच्या आई सोबत, इंदिराबाई केळकर आणि यशवंत बुआ जोशी यांच्याकडून मिळाले.
नंतर रंगभूमीवरील संगीताची परंपरा जोपासण्यासाठी त्यांनी ‘नाट्यसंगीत’ या विशेष कलाप्रकारात प्रावीण्य मिळवले. या क्षेत्रात अनेक ज्येष्ठ व दिग्गज व्यक्तींचे मार्गदर्शन त्यांना लाभले. त्यांनी संगीत विशारद ही उपाधी आणि सायकॉलॉजी विषयात बी.ए. पदवी प्राप्त केली. शिक्षण आणि संस्कार यांचा सुरेख संगम म्हणजेच नयनाताई.
त्यांनी आपल्या आईसोबत ‘चंडीपूजा’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका साकारून वयाच्या चौथ्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्या काळात मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमी ही परंपरेने समृद्ध असली, तरी स्त्रियांना तितक्या संधी नव्हत्या. पण नयनाताईंनी स्वतःला सिद्ध केले. त्यांनी एकाचवेळी गायन, रंगभूमी आणि दूरदर्शनवरही अनेक कलाकृती अजरामर केल्या आहेत. १९५४ पासून ते आजतागायत म्हणजेच ७० वर्षांहून अधिक काळाचा अविरत कलाप्रवास! सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक, कॉमेडी, दुःखांत, तसेच शास्त्रीय संगीतावर आधारित नाट्यप्रयोग अशा विविध प्रकारची तब्बल ११० नाटके त्यांनी केली आहेत. एकच प्याला, संगीत पुण्यप्रभाव, संगीत मानापमान, संगीत शारदा, संगीत स्वयंवर, सौजन्याची ऐशी तैशी, श्री तशी सौ, देव नाही देव्हाऱ्यात ही त्यांची विशेष उल्लेखनीय नाटकं आहेत. या नाटकांमध्ये त्यांनी स्त्रीच्या विविध छटांना जीवन दिलं आहे. कधी भक्त प्रेयसी, कधी सशक्त पत्नी, तर कधी समाजाशी दोन हात करणारी विद्रोही स्त्री. संवादफेक, नेमके सूर आणि डोळ्यांतून व्यक्त होणारे भाव हे सर्व एकत्र आल्यामुळे त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत.
मराठीसह हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांनी २५ मराठी, ४ हिंदी, आणि ६ गुजराती चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट चुपके चुपके (हिंदी) हृषिकेश मुखर्जी, मिली (१९७५, हिंदी) अमिताभ बच्चन आणि जया भादुरी, एक फूल चार हाफ (१९९१ मराठी), गाव तसं चांगलं (मराठी),चल लव्ह कर (२००९), माझ्या नवऱ्याची बायको (२०१३), मध्यमवर्ग (२०१४), १५ ऑगस्ट (२०१९, नेटफ्लिक्स) या चित्रपटात त्यांनी सशक्त आणि भावनिक भूमिका साकारून आधुनिक पिढीपर्यंत आपली कला पोहोचवली. लेक असावी तर अशी (२०२४) नव्या काळातील भूमिकांमध्येही त्यांनी स्वतःला जुळवून घेतलं आहे. आई, वहिनी, शिक्षिका, समाजसेविका आणि कधी हळवी प्रेमळ स्त्री असे त्यांच्या चित्रपटांतून स्त्रीचे विविध पैलू दिसतात. दूरदर्शनच्या माध्यमातूनही काही हिंदी, काही मराठी अशा ४० मालिकांमध्येही त्यांनी काम केलं आहे.
त्यांचा आवाज आणि अभिनय दोन्ही दूरदर्शनवरील पात्रांना वास्तवरूप देतात. नेहमीच प्रत्येक पात्राला आत्मसात करत भूमिका साकारणं हे नयनाताईंचं वैशिष्ट्य आहे. नयना ताई ह्या केवळ अभिनेत्रीच नाही तर त्या एक उत्तम गायिकाही आहेत. त्यांचा आवाज मृदू आणि शास्त्रीयतेने नटलेला आहे. त्यांनी नाट्यसंगीत, भक्तिगीते आणि गझल या सर्व प्रकारांमध्ये गाणी सादर केली आहेत. त्यांच्या प्रत्येक सादरीकरणात सूर आणि भावना यांचं सुंदर मिश्रण दिसून येतं. त्यांनी अनेक रंगभूमीवरील गाणी स्वतःच्या आवाजात गायली आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार, “अभिनय आणि गाणं या दोन्ही गोष्टींचा थेट संबंध एकत्रितरीत्या मनाशीच आहे.”
नाट्य क्षेत्रात कार्यरत असताना नैनाताईंचं लग्न समाजकार्य आणि राजकारणाशी निगडित असणाऱ्या विश्वेश जोशी यांच्याशी झालं. सासरच्या भक्कम पाठिंब्यामुळेच आजपर्यंतचा प्रवास यशस्वीरीत्या करू शकल्याचं नयनाताई नमूद करतात. सिनेसृष्टीत काम करताना स्वतःच्या मनावर ताबा असणं तसेच सामाजिक कार्यात सक्रिय राहणं व चौफेर वाचन असणं गरजेचं आहे असा मोलाचा सल्ला नयनाताई सगळ्यांना देतात.
त्यांच्या दीर्घ आणि समर्पित कलाप्रवासाला अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. भारत सरकारकडून देण्यात येणारा पद्मश्री पुरस्काराने नैनाताईंना सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाकडून आण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार मराठी नाट्य परिषद पुरस्कार, कुमार कला केंद्र पुरस्कार, महाराष्ट्र कला केंद्र पुरस्कार, मुंबई मराठी साहित्य संघ पुरस्कार हे सगळे पुरस्कार त्यांच्या अभिनय आणि संगीत क्षेत्रातील योगदानाचे प्रतीक आहेत. आपला अनुभव नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक बाल कलाकारांसाठी बालनाट्य कार्यशाळा, मुलाखती आणि रेडिओ कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. भविष्यकालीन संकल्पनामध्ये बालनाट्य शिबिरातून मराठी भाषेची गोडी त्यांना निर्माण करायची आहे. त्या अनेक नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या अभिनयातील भावनात्मक खोली, संवादातील सहजता आणि गाण्यातील सुरेलपणा यामुळे त्या परदेशातील मराठी व भारतीय प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय आहेत. त्यांचे प्रयोग आणि संगीत कार्यक्रम अमेरिकेपासून ते युरोप आणि मध्य-पूर्व देशांपर्यंत सादर झालेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी नाट्यसंगीताची ओळख निर्माण करण्यात त्यांचा वाटा आहे.
नयनाताईंचे व्यक्तिमत्त्व शांत, आत्मविश्वासपूर्ण आणि संवेदनशील आहे. त्यांच्या चेहऱ्यावर सदैव हसू असतं; त्यांची वाणी मृदू पण ठाम असते. कला ही त्यांच्यासाठी साधना आहे, त्यांच्या नजरेतून दिसणारी समर्पणाची झलक आजही तरुण कलाकारांना प्रेरणा देते. त्या म्हणतात, “रंगभूमी माझ्यासाठी मंदिर आहे; प्रत्येक सादरीकरण म्हणजे आराधना.” हा दृष्टिकोनच त्यांच्या सात दशकांच्या प्रवासाचं रहस्य आहे. त्यांनी आपली कला आणि व्यक्तिमत्त्व अशा पातळीवर नेलं आहे की आजही प्रेक्षक त्यांना ‘नयना ताई’ म्हणून प्रेमाने ओळखतात. नयनाताईंचा कलाप्रवास म्हणजे सातत्य, समर्पण आणि सृजनशीलतेचं सुंदर उदाहरण आहे.बालकलाकारापासून ते पद्मश्रीपर्यंतचा त्यांचा प्रवास हा केवळ करिअर नव्हे, तर भारतीय रंगभूमीच्या इतिहासाचा एक अमूल्य अध्याय आहे. त्यांनी मराठी संस्कृतीला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. अशा कलाक्षेत्रात मार्गदर्शक संस्था असणाऱ्या, कलाकारांच्या जीवनात दीपस्तंभाप्रमाणे प्रकाशवाटा दाखवणाऱ्या या गुरुमाऊलीला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा. Vaishu.gaikwad78@gmail.com