
मुंबई: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता सचिन पिळगांवकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याच्या एका नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये त्याने एक आठवण सांगितली, जी सध्या सोशल मीडियावर गाजत आहे, आणि अर्थातच, चर्चांनाही उधाण आलं आहे.
या व्हिडीओमध्ये सचिनने दिग्गज निर्माते राजकुमार बडजात्या यांच्या निधनासंदर्भात एक भावनिक प्रसंग सांगितला.
“राजकुमार बडजात्या आजारी होते. त्यांच्या नातवाने त्यांना शेवटची इच्छा विचारली. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की ‘मला सचिनचं गाणं – 'शाम तेरी बंसी पुकारे राधा नाम' – पाहायचं आहे.’”
सचिनच्या म्हणण्यानुसार, हे गाणं बडजात्यांना YouTube वर दाखवलं गेलं आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवलं गेलं, जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हा किस्सा सांगताना सचिन भावुक झाल्याचंही व्हिडीओमध्ये दिसतं.
त्याच्या या प्रतिक्रियेनंतर नेटिझन्सनी सचिन यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. अनेकांनी त्याचं वक्तव्य अतिशयोक्तीपूर्ण आणि "सेल्फ-सेंट्रिक" असल्याचं म्हटलं आहे.
एका युजरने उपरोधाने लिहिलं "दादासाहेब फाळके यांना आता सचिन पिळगांवकर पुरस्कार देण्यात यावा," तर दुसऱ्याने विचारलं – “राज कपूर की राजकुमार ? मोबाईल आणि YouTube कुठे होते तेव्हा?”
काहींनी हेही लक्षात आणून दिलं की, सचिन हे नेहमी अशा व्यक्तींवर गोष्टी सांगतात, ज्या आता हयात नाहीत – म्हणजे त्या गोष्टी सत्य आहेत का हे पडताळणं कठीण होतं.
तरीही काही युजर्स सचिन यांच्या बाजूनेही उभे राहिले. एका युजरने स्पष्ट केलं की सचिन ज्या राजकुमार बडजात्यांचा उल्लेख करत आहेत, त्यांचं निधन २०१९ मध्ये झालं होतं, त्यामुळे त्यावेळी मोबाईल आणि YouTube सहज उपलब्ध होते
त्याच्या मते, गाणं सुंदर आहे आणि अंतिम क्षणी कोणाला काय ऐकायचं असेल, हे त्याच्या भावविश्वावर अवलंबून असतं.
या प्रसंगावर अनेक मजेशीर मिम्सही सोशल मीडियावर झळकत आहेत. काहींनी सचिनच्या ‘भावनिक आठवणी’वर विनोदी शैलीत प्रश्न उपस्थित करत खिल्ली उडवली आहे.
सचिन पिळगांवकरने सांगितलेली ही गोष्ट खरंच घडली होती की नाही, यावर चर्चा सुरुच आहे. पण इतकं मात्र नक्की की त्याच्या प्रत्येक वक्तव्यावर समाजमाध्यमांतून प्रतिक्रिया येणं, हे आता नित्याचंच झालं आहे.