Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा, आता तीन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र; ६४८ कोटी १५ लक्ष ४१ हजार रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा, आता तीन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र; ६४८ कोटी १५ लक्ष ४१ हजार रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता

६,१२,१७७ शेतकऱ्यांना लाभ मिळणार

मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्य शासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी मान्यता दिली असून आता या शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१ हजार रुपयांच्या निधीच्या वितरणाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. आजपर्यंत मदत व पुनर्वसन विभागाकडून यंदाच्या खरीप हंगामातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सुमारे ८१३९ कोटी रुपये इतक्या रकमेचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत, अशी माहितीही मंत्री जाधव पाटील यांनी यावेळी दिली.

मंत्री पाटील म्हणाले, राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील सहा लाख ५६ हजार ३१०.८३ हेक्टर क्षेत्रातील बाधित पिकांच्या नुकसानीपोटी सहा लाख १२ हजार १७७ शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यापूर्वी या शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत मदत मंजूर करण्यात आली होती, तर आता अतिरिक्त एक हेक्टरसाठी ही वाढीव मदत देण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा आधार, दिलासा मिळणार असल्याचा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी व्यक्त केला.

छत्रपती संभाजीनगर विभाग- बीड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यातील तीन लाख ५८ हजार ६१२ शेतकऱ्यांच्या तीन लाख ८८ हजार १०१.१३ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी ३४६ कोटी ३१ लाख ७० हजार रुपये.

नागपूर विभाग- नागपूर, चंद्रपूर , वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यातील तीन हजार ९३१ शेतकऱ्यांच्या सात हजार ६९८.२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी सात कोटी ५१ लाख ७५ हजार रुपये.

नाशिक विभाग – नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील ५३ हजार ८६५ शेतकऱ्यांच्या ५० हजार ६२९ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी ५९ कोटी ३६ लाख १३ हजार रुपये.

अमरावती विभाग – अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील एक लाख ७ हजार ६१५ शेतकऱ्यांच्या एक लाख ३९ हजार ४३८.२३ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी १३१ कोटी ५६ लाख ४७ हजार रुपये.

पुणे विभाग – सोलापूर व सांगली जिल्ह्यातील ८८ हजार १४३ शेतकऱ्यांच्या ७० हजार ४१८.८९ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी १०३ कोटी ३७ लाख २० हजार रुपये.

कोकण विभाग – ठाणे व पालघर जिल्ह्यातील ११ शेतकऱ्यांच्या २५.३३ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी दोन लाख १६ हजार रुपये.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >