Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

रेड कॉरिडॉर आता ग्रोथ कॉरिडॉर बनला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पोलिस स्मृतीदिनानिमित्त वक्तव्य

रेड कॉरिडॉर आता ग्रोथ कॉरिडॉर बनला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पोलिस स्मृतीदिनानिमित्त वक्तव्य

नवी दिल्ली: पोलीस स्मृतीदिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशातील पोलीस आणि सुरक्षा दलांच्या शौर्याला सलाम करताना म्हटलं की, “नक्षलवाद आता हळूहळू इतिहासजमा होत आहे.” ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या ठोस धोरणांमुळे आणि पोलीस दलाच्या अथक प्रयत्नांमुळे नक्षलवादाविरुद्धच्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. पूर्वी राज्याविरुद्ध शस्त्रे उचलणारे नक्षलवादी आता आत्मसमर्पण करून विकासाच्या प्रवाहात सहभागी होत आहेत, हेच त्या मोहिमेचं यश असल्याचं त्यांनी नमूद केलं.

शहीद पोलीस अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहताना राजनाथ सिंह म्हणाले, “पोलीस आणि सुरक्षा दल प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जातात, त्यामुळेच आज देश सुरक्षित आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने पोलीस दल केवळ बळकट केले नाही, तर त्यांना आधुनिक तंत्रज्ञान, साधनं आणि प्रशिक्षण उपलब्ध करून दिलं आहे.

राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, २०१८ मध्ये राष्ट्रीय पोलीस स्मारकाची स्थापना पोलीस कर्मचाऱ्यांच्या बलिदानाचं स्मरण करण्यासाठी करण्यात आली. आज पोलीस दल ड्रोन, देखरेख यंत्रणा, फॉरेन्सिक लॅब आणि डिजिटल पोलिसिंगसारख्या आधुनिक संसाधनांनी सुसज्ज आहे, हे देशाच्या सुरक्षेचं बळ वाढवणारं पाऊल असल्याचं त्यांनी सांगितलं.

नक्षलग्रस्त भागांचा उल्लेख करताना ते म्हणाले, “ज्या प्रदेशात एकेकाळी नक्षलवादी दहशत माजवत होते, तिथे आज शाळा, रस्ते आणि रुग्णालये उभी राहिली आहेत. रेड कॉरिडॉर आता ग्रोथ कॉरिडॉरमध्ये बदलला आहे.” हे यश सरकारसोबतच पोलिस, सीआरपीएफ, बीएसएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांचे फळ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

राजनाथ सिंह पुढे म्हणाले, “सेना देशाच्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करते, तर पोलिस सामाजिक अखंडतेचे रक्षण करतात.” नागरिक रात्री शांत झोपू शकतात, कारण सैन्य सीमारेषेवर आणि पोलीस आपल्या परिसरात सतर्क आहेत, हा विश्वासच भारताच्या सुरक्षेचा खरा पाया आहे, असंही ते म्हणाले.

Comments
Add Comment