
पुणे : राजगडच्या दुर्गम वस्त्यांमध्ये तब्बल ७८ वर्षांनी वीज आली आहे. उमराटकर-मोरे वस्तीला जणू काही दिवाळी भेट मिळाली आहे. अतिदुर्गम भागातील बार्शीमाळ गावामधील उमरटकर वस्ती व बालवड गावातील मोरे वस्तीत वीज जोडणी नव्हती. त्यामुळे ऐन दिवाळी अंधारात साजरी करणाऱ्या उमराटकर-मोरे वस्तीतील स्थानिकांच्या चेहऱ्यावर हसू उमलले.
महावितरणाच्या कार्यतत्परतेमुळे नागरिकांचा वीज जोडणीचा प्रश्न कित्येक वर्षांनी सुटला आहे. वस्तीतील नागरिकांनी घरात वीज मिळावी म्हणून महावितरणकडे अर्ज केला होता. मंजुरीकरिता अंदाजपत्रक मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता बैकर यांच्याकडे वेल्हा शाखा कार्यालयामधून शाखा अभियंता सचिन कुलकर्णी यांनी पाठविले. त्यावर कार्यकारी अभियंता बैकर यांनी वास्तव्य जाणून घेत अंदाजपत्रक तात्काळ मंजूर करून कामास सुरूवात केली.
महावितरणने अवघ्या ४८ तासांत काम पूर्ण करून सर्व घरांना वीज मीटर बसवले. त्यामुळे या भागातील सर्व घरे प्रकाशमय झाली आहेत. त्यामुळे यावर्षीची नागरिकांची दिवाळी प्रकाशात मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. त्याबद्दल नागरिकांनी महावितरणचे कर्मचारी, अधिकारी कुलकर्णी, थोरवे मॅडम, सोनसळे, आग्रवाल ठेकेदार व मुळशी विभागचे कार्यकारी अभियंता बैक यांचे आभार मानले आहेत.