Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

नाचणीचे बिस्कीट

नाचणीचे बिस्कीट

सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे

दिवाळीचा फराळ म्हटलं की गोड, तूप, साखर आणि सुगंध यांचा संगम आठवतो. पण आजच्या आरोग्य-जागरूक युगात पारंपरिक गोडधोडाला नवी झळाळी द्यायची असेल, तर नाचणीचे बिस्कीट हा एक उत्तम पर्याय आहे. नाचणीचं पीठ, थोडंसं साजूक तूप आणि गूळ. एवढंच काय ते साधं पण चविष्ट मिश्रण! प्रत्येक घासात लहानपनीची आठवण आणि आरोग्याचा स्पर्श.

साहित्य : नाचणी पीठ : १ कप गव्हाचं पीठ : अर्धा कप साजूक तूप : अर्धा कप गूळ : अर्धा कप (किसलेला) वेलदोडा पावडर : अर्धा टीस्पून बेकिंग पावडर : अर्धा टीस्पून दूध : २ ते ३ टेबलस्पून (आवश्यकतेनुसार) चिमूटभर मीठ

कृती : एका पॅनमध्ये तूप आणि किसलेला गूळ मंद आचेवर वितळवा. गूळ पूर्ण विरघळल्यावर गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या. एका बाऊलमध्ये नाचणी पीठ, गव्हाचं पीठ, बेकिंग पावडर, मीठ आणि वेलदोडा पावडर एकत्र करा. चाळणीने २-३ वेळा चाळून घ्या. थंड झालेलं गुळाचं मिश्रण पीठात घालून एकसंध गोळा मळा. थोडं दूध घालून घट्टसर पण मऊ गोळा तयार करा. गोळा लाटून कुकी-कटरने हवे तसे आकार कापा. ओव्हन १८० अंश सेल्सिएसवर गरम करून n बिस्कीट १५–१८ मिनिटं बेक करा. बाहेर काढून थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा.

टीप : जास्त कुरकुरीत हवे असल्यास थोडं जास्त तूप वापरा. मुलांसाठी चव वाढवायची असेल तर थोडं कोको पावडर किंवा बारीक चिरलेला ड्रायफ्रूटही घालू शकता.

Comments
Add Comment