Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळ दौऱ्यावर, अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळ दौऱ्यावर, अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळच्या दौऱ्यावर असतील. हा दौरा धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचा आहे.

राष्ट्रपती मुर्मू २१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी केरळची राजधानी तिरुअनंतपुरम येथे पोहोचतील. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २२ ऑक्टोबर रोजी त्या प्रसिद्ध शबरीमला मंदिरात दर्शन आणि आरती करतील. या भेटीला विशेष धार्मिक महत्त्व असून राज्यभरात तिची उत्सुकता आहे.

राष्ट्रपती २३ ऑक्टोबर रोजी राजभवनात भारताचे माजी राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करतील. हा कार्यक्रम माजी राष्ट्रपतींच्या सामाजिक आणि राजकीय योगदानाला अभिवादन करणारा आहे. त्याच दिवशी त्या वर्कला येथील शिवगिरी मठात नारायण गुरु यांच्या महासमाधी शताब्दी सोहळ्याला उपस्थित राहतील. या कार्यक्रमाद्वारे सामाजिक एकता, शिक्षण आणि आध्यात्मिकतेच्या विचारांना प्रोत्साहन देण्याचा संदेश दिला जाणार आहे. यानंतर राष्ट्रपती पलाई येथील सेंट थॉमस कॉलेजच्या प्लॅटिनम ज्युबिली समारोप समारंभाला उपस्थित राहतील. यानंतर २४ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती एर्नाकुलम येथील सेंट टेरेसा कॉलेजच्या शताब्दी समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी होतील. हे कॉलेज महिला शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी ओळखले जाते.

केरळ सरकार आणि स्थानिक प्रशासन राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या स्वागत आणि सुरक्षेच्या तयारीत व्यस्त आहे. नागरिक आणि विद्यार्थी वर्गामध्ये राष्ट्रपतींच्या आगमनाबद्दल उत्साहाचे वातावरण आहे.

Comments
Add Comment