Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

विषारी कफ सिरप प्रकरणात ‘कोल्ड्रिफ’ कंपनीचा मालक न्यायालयीन कोठडीत

विषारी कफ सिरप प्रकरणात ‘कोल्ड्रिफ’ कंपनीचा मालक न्यायालयीन कोठडीत

नवी दिल्ली : मध्य प्रदेशात २० हून अधिक निष्पाप बालकांचा बळी घेणाऱ्या विषारी कफ सिरप ‘कोल्ड्रिफ’ प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या सिरपचे उत्पादन करणाऱ्या तामिळनाडूस्थित श्रीसेन फार्मा कंपनीचे मालक रंगनाथन गोविंदन यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे.

या प्रकरणात गोविंदन यांना यापूर्वी १० दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. या दरम्यान विशेष तपास पथक (SIT) ने त्यांची चौकशी तामिळनाडूतील कांचीपुरम येथे केली. कोठडी संपल्यानंतर त्यांना परसिया येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश गौतम गुर्जर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने रंगनाथन गोविंदन यांना न्यायालयीन कोठडी दिली.

SIT प्रमुख जितेंद्र सिंग जाट यांनी सांगितले की, या प्रकरणात छिंदवाडातील डॉ. प्रवीण सोनी, घाऊक औषध विक्रेता राजेश सोनी आणि डॉ. सोनी यांच्या पत्नीच्या मेडिकल स्टोअरमधील फार्मासिस्ट सौरभ जैन हे तिघेही आधीच कोठडीत आहेत. तपासात उघड झाले आहे की ‘कोल्ड्रिफ’ सिरप प्यायल्यानंतर अनेक मुलांच्या किडनी निकामी झाल्या आणि त्यामुळे मृत्यू झाले.

या धक्कादायक घटनेनंतर सरकारने तत्काळ पावले उचलली आहेत. राज्य सरकारने दोन औषध निरीक्षक आणि FDAचे उपसंचालक यांना निलंबित केले असून, राज्याच्या औषध नियंत्रकाची बदली करण्यात आली आहे. तसेच, संबंधित औषध उत्पादन युनिट सील करण्यात आले आहे.

दरम्यान, स्थानिक न्यायालयाने डॉ. सोनी यांचा जामीन अर्ज फेटाळला असून त्यांनी आता मध्य प्रदेश उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणामुळे औषधनिर्मिती क्षेत्रातील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, सरकारकडून भविष्यात कडक कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >