Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

नागा अतिरेक्यांवर ड्रोन स्ट्राईक ? भारतविरोधी पी. आंग माई ठार ?

नागा अतिरेक्यांवर ड्रोन स्ट्राईक ? भारतविरोधी पी. आंग माई ठार ?

नायपिदाव : भारत-म्यानमार सीमेवर बंडखोरांच्या हालचाली वाढू लागल्यामुळे तणावाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर २० ऑक्टोबरच्या रात्री नागा अतिरेकी गट NSCN (K-YA) च्या ठिकाणांवर एक मोठा ड्रोन हल्ला झाल्याचे वृत्त आहे. एकाच वेळी अनेक ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात भारतविरोधी नागा अतिरेक्यांचा स्वयंघोषीत वरिष्ठ कमांडर पी. आंग माई ठार झाल्याचे वृत्त आहे. अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण म्यानमारमधील प्रसारमाध्यमांनी पी. आंग माई ठार झाल्याचे सांगितले.

ड्रोन स्ट्राईकमध्ये भारतविरोधी नागा अतिरेक्यांची कमांड पोस्ट आणि आजूबाजूच्या अतिरेक्यांच्या निवासी इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. याच हल्ल्यात भारतविरोधी नागा अतिरेक्यांचा स्वयंघोषीत वरिष्ठ कमांडर पी. आंग माई ठार झाल्याचे वृत्त आहे. हल्ला झाल्यापासून कमांड युनिट आणि पी. आंग माई यांच्यातील संपर्क तुटला आहे.

याआधी जुलै २०२५ मध्ये भारत-म्यानमार सीमेवर अतिरेक्यांवर ड्रोन हल्ला झाला होता. उल्फा-आय, एनएससीएन (के) आणि युंग आंग आणि आंग माई गटांच्या अनेक लपण्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते. त्या हल्ल्यात नयन असोम, ब्रिगेडियर गणेश असोम आणि कर्नल प्रदीप असोम यांच्यासह तीन वरिष्ठ उल्फा-आय नेते मारले गेले होते. एनएससीएन (के) चे अनेक कमांडर देखील मारले गेले होते.

अचूक ड्रोन हल्ल्यांमुळे अतिरेक्यांच्या कारवाया थंडावल्या आहेत. हे हल्ले गुप्तचर यंत्रणांकडून मिळणारी माहिती तसेच भारत आणि म्यानमार यांच्यातील समन्वय याआधारे भारतीय सुरक्षा यंत्रणाच करत असल्याच्या बातम्या म्यानमारमधील प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत. यावर भारताकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

Comments
Add Comment