Monday, October 20, 2025
Happy Diwali

गाझा पट्टी पुन्हा अशांत

गाझा पट्टी पुन्हा अशांत

गेल्या दोन दिवसांपासून गाझा पट्टी येथील इस्रायली सैनिकांनी तीव्र हल्ले तर केले असून युद्धविराम झाल्यानंतर जे शांततेचे वातावरण निर्माण झाले होते ते आता पार उद्ध्वस्त झाले आहे. युद्धविरामापूर्वी जवळपास गाझावासीयांना ६०० दिवस बाॅम्बहल्ल्यांचा सामना करावा लागला होता. गाझामधील ४६,००० अधिक लोक मारले गेले आहे. त्या हिंसाचाराची पुन्हा आठवण ताजी व्हावी अशीच परिस्थिती सध्या गाझा पट्टीत आणि तेथील रफा परिसरात आहे. मारलेल्या लोकांपैकी १८,००० मुले आहेत. यावरून गाझामधील परिस्थिती किती भीषण आहे हे लक्षात यावे. अर्थात यास दोन्ही बाजू दोषी आहेत हे विसरून चालणार नाही. कारण एकीकडे हमास युद्धबंदी स्वीकारते पण तिचे पालन करत नाही आणि दुसरीकडे इस्रायली सैन्य तर याचीच वाट पाहत असते, की कधी युद्धंबंदी मोडता येईल. यात मानवतेचा मात्र मुडदा पडतो. गाझामध्ये शांतता करार अमलात आणायचा असेल तर तो पूर्णपणे आणि खऱ्या अर्थाने अमलात आला पाहिजे. पण प्रत्यक्षात तसे होत नाही. आताची युद्धबंदी ही तात्पुरती आणि वरवरची होती. त्यातून खऱ्या अर्थाने शांतता प्रस्खापित झाली नाही. कायमची शांतता प्रस्थापित झाली तरच युद्धबंदीला काही अर्थ राहील. पण तसे होत नाही हे तर दुःख आहे. याला इस्त्रायल जितके दोषी आहे तितकेच हमासही आहे.

पॅलेस्टाईनचा गाझा भूमीवरील कब्जा हा अवैध असल्याने हा संघर्ष संपू शकत नाही असा पॅलेस्टाईनच्या पक्षपाती लोकांचा दावा असतो. पण ते हमासच्या अतिरेकी कारवायांकडे हेतूतः दुर्लक्ष करतात. हमास आणि इस्त्रायलने एकमेकांवर कराराचा भंग केल्याचा आरोप केला आहे, तर आपल्याला शांततेचे नोबेल पारितोषिक मिळावे म्हणून जो अट्टहास केला त्या ट्रम्प यांनी अजूनही गाझामध्ये युद्धबंदी कायम आहे असे म्हटले आहे. पण असे म्हणणे म्हणजे आत्मवंचना ठरेल. इस्त्रायली सैनिकांनी केलेल्या गोळीबारात ४ लोक ठार झाल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या युद्धबंदी करारानंतर हा या भागातील संघर्षाचा सर्वात वाईट दिवस आहे असे जे म्हटले गेले ते अगदी रास्त आहे. गेल्या आठव़ड्यात ट्रम्प यांनी इजिप्तमधील शर्म एल शेखमध्ये जागतिक नेत्यांसमोर बोलताना मध्यपूर्वेतील शांतता प्रस्थापित केली आहे असा दावा केला होता. पण त्या दव्याची शाई वाळतही नाही तोच इस्रायल आणि हमास यांच्यातील रक्तरंजित संघर्षात प्राणहानी झाल्याने युद्धबंदी मोडीत निघाल्याची बातमी ट्रम्प यांची विश्वासार्हता संपल्याची जाणीव करून देते. इस्त्रायली युद्धविमाने पुन्हा सक्रिय झाली आहेत आणि भविष्यात पुढे आणखी काय वाढून ठेवले आहे याची प्रचिती येते. हमासने अद्याप शस्त्रे हाती घेतलेली नाहीत तरीही अमेरिकेने युद्धबंदी कायम राहण्यासाठी या प्रांतात पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. कारण अमेरिका जेव्हा दुसऱ्या महायुद्धात उतरली तेव्हाच युद्धाचा निकाल लागला होता.

त्यामुळे आता ट्रम्प यांना केवळ युद्धबंदी कायम आहे असे म्हणून आपली जबाबदारी झटकता येणार नाही, युद्धबंदीचे उल्लंघन कुणी केले हा वादाचा प्रश्न आहे. कारण इस्त्रायली सैन्याने हमासने अगोदर युद्धबंदीचा भंग केल्याचा आरोप केला तर इस्त्रायली सैन्याने केवळ हमासच्या हल्ल्यांना उत्तर दिले असे म्हटले आहे. त्यामुळे या वादात न जाता आता शक्तिशाली लोकांनी यातून मार्ग काढावा आणि लोकांना शांततेच्या मार्गाने जाण्यास मदत करावी असाच सर्वसामान्य लोकांचा आग्रह आहे. हमास आणि इस्त्रायली सैनिक यातील कोण खोटे बोलत आहे हे सांगणे अवघड आहे. युद्धबंदीचे उल्लंघन झाले हे उघड आहे आणि ते कुणाच्या आगळीकीने झाले हे या क्षणी बाजूला ठेवले तरीही गाझामध्ये आजची वेळ अत्यंत चिंताजनक आहे हे निश्चित आहे. हमासने इस्रायलवर युद्धबंदी भंग केल्याचा आरोप करणे आणि इस्रायलने तसाच आरोप करणे यातून काहीही प्रश्न सुटणार नाही. गाझामधील निरपराध लोक मात्र मारले जात राहतील आणि त्यांना न्याय देणारा कुणी नसेल. कोणताही धर्म यात माघार घेण्यास तयार नाही. गप्पा मात्र सारे मानवतेच्या मारतात. पण मानवतेचा सर्वात जास्त मुडडा याच भूमीवर पडला आहे. हा इतिहास आहे.

त्यामुळे इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यातील या युद्धबंदीला अगोदरच ताण बसला होता. जराही हिंसक घटनेनंतर ती युद्धबंदी कोसळली आणि तीच आज शक्यता दिसत आहे. आता तर इस्रायलने गाझामध्ये मदत पाठवणे बंद केले आहे. दोन वर्षांच्या विनाशकारी संघर्षांनंतर ट्रम्प यांच्या मध्यस्थीने शांतता प्रस्थापित झाली आणि हिंसाचार आटोक्यात आला होता, पण आता पुन्हा ते दिवस आता परतले आहेत. या पूर्वीही हमास आणि इस्त्रयायल यांच्यात युद्धबंदी लागू झाली होती. पण ती अनेकदा तुटली तसेच यंदाही झाले. कारण अत्यंत घाईघाईने प्रश्नाचा साकल्याने विचार न करता ती अमलात आणली गेली, त्यामुळे युद्धबंदी तुटणारच होती. तसेच झाले आहे. युद्धविराम पार पाडण्यासाठी ट्रम्प यांच्याकडे दृढनिश्चय आहे का हा मूळ प्रश्न आहे. वाटाघाटी गंभीरप्णे करण्याची अमेरिकेची म्हणजे ट्म्प यांची खरोखर इच्छा आहे का हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. युद्धबंदी यशस्वी होत नाही किंवा झाली नाही याला कारण आहे कारण ट्रम्प यांचे सर्व काही आपल्यालाच माहीत आहे असे वाटणारे धोरण. त्यांच्या दिखाऊपणाचे परिणाम दोन्ही बाजूंना भोगावे लागत आहेत हे वास्तव आहे.

इस्त्रायली नेतृत्व आणि हमासचे नेते यांच्याकडे वचनबद्धता असली तरीही त्यांच्याकडे असे काही स्पॉयलर गट आहेत की जे दृष्टिपथात असलेली शांतता प्रत्यक्षात येऊ देत नाहीत. आता ट्रम्प यांनी शांतता करार अमलात आणल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतली असली तरीही मध्य पूर्वेत किंवा पश्चिम आशियात ट्रम्प यांचा प्रभाव पूर्वीसारखा राहिला नाही हेच वास्तविक कारण आहे. त्यामुळे शांतता करार होतील आणि ते काही काळ चालून मोडले जातील. सध्या गाझाची जनता मात्र वाऱ्यावर आहे आणि तिला वालीही कुणी उरलेला नाही हे सत्य आहे.

Comments
Add Comment