Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

बिर्याणी पडली महागात! ग्राहकाने केली हॉटेल मालकाची हत्या, वाचा सविस्तर

बिर्याणी पडली महागात! ग्राहकाने केली हॉटेल मालकाची हत्या, वाचा सविस्तर

झारखंड: रांचीमध्ये एक अशी घटना घडली आहे, जी कळताच तुम्हाला धक्का बसेल. शाकाहारी बिर्याणी ऐवजी मांसाहारी बिर्याणी दिल्यामुळे झालेल्या वादातून ग्राहकाने हॉटेल मालकाची हत्या केली आहे. शुल्लक कारणामुळे एखाद्या व्यक्तीची हत्या करणे किती सर्वसामान्य झाले आहे, हे घटनेतून ठळक झाले आहे. ही घटना रांचीमधील कांके पिथोरिया रोडवरील शेफ चौपाटी या हॉटेलमध्ये घडली आहे.

शेफ चौपाटी या रेस्टॉरंटमध्ये एका व्यक्तीने शाकाहारी बिर्याणी मागवली होती. मात्र त्याला मांसाहारी बिर्याणी देण्यात आली. यामुळे हॉटेलमध्ये वाद निर्माण झाला. या वादाचे प्रमाण एवढे वाढले कि, ग्राहकाने शेफ चौपाटी हॉटेलचे मालक विजय कुमार यांची गोळ्या घालून हत्या केली. या घटनेनंतर आरोपी घटना स्थळावरून पळून गेला असून पोलीसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.

हॉटेल मालकावर गोळीबार झाल्यानंतर आसपासच्या लोकांनी हॉटेल मालक विजय यांना रांची येथील रिम्स रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या हत्येमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून पोलीसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रांचीचे ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रवीण पुष्कर हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. या हत्येमागे फक्त बिर्याणीचे कारण होते की दुसरे काही कारण होते याचा तपास पोलीस करत आहे. या घटनेतील आरोपीला पकडण्यासाठी रांचीमधील काही ठिकाणी नाकाबंदी करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. तसेच पोलीस हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही बारकाईने तपासणी करत आहेत.

Comments
Add Comment