Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

काशिमीरा परिसरात मोठा राडा, २५ रिक्षांचे नुकसान, मुलींची छेडछाड; मंत्री प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली बांगलादेशींच्या सहभागाची शंका

काशिमीरा परिसरात मोठा राडा, २५ रिक्षांचे नुकसान, मुलींची छेडछाड; मंत्री प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली बांगलादेशींच्या सहभागाची शंका

ठाणे : राज्यभरात दिवाळीचा जल्लोष सुरू असताना ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मीरा रोडजवळील काशिमीरा परिसरात दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी संध्याकाळी सुरू झालेला हा वाद आज पुन्हा उफाळला आणि त्याचे रूप गंभीर झाले. या राड्यात तब्बल २५ रिक्षांची तोडफोड करण्यात आली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेनंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांची चौकशी केली. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली आणि माध्यमांशी संवाद साधताना काही गंभीर आरोप केले.

सरनाईक म्हणाले, “माशाचा पाडा परिसरात काही गुंडांनी आमच्या आया-बहिणींची छेड काढली. इतकेच नाही, तर एका लहान मुलीचीही छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीला मी स्वतः पोलीस ठाण्यात पाठवले असून, गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.” त्यांनी पुढे सांगितले की, “या परिसरात लोकवस्ती झपाट्याने वाढत असताना गुंडगिरीही प्रचंड वाढली आहे.”

याचबरोबर सरनाईक यांनी या भागात अंमली पदार्थ विक्री आणि बाहेरून आलेल्या संशयास्पद व्यक्तींच्या हालचालींवर बोट ठेवले. “गांजा-चरस सारखे पदार्थ मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. पोलिसांनी आठ दिवसांपूर्वी एक किलो गांजा जप्त केला होता. तरीदेखील गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं येथे मोठ्या प्रमाणात येत आहेत. माझ्या अंदाजानुसार काही बांगलादेशी किंवा रोहिंग्या घुसखोर या परिसरात राहात असण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला.

सरनाईक यांनी पुढे सांगितले की, “मी पोलिसांना सखोल चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. स्थानिकांनी येथे पोलीस चौकीची मागणी केली असून ती लवकरच उभारण्यात येईल. परिसरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कडक कारवाई केली जाईल.”

या घटनेनंतर काशिमीरा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, दोन्ही गटातील काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दिवाळीच्या उत्साहात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >