
सातारा: अभिनेता रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' या आगामी चित्रपटाच्या दरम्यान एका कलाकाराचा मृत्यू झाला. सौरभ शर्मा असे या कलाकाराचे नाव होते. साताऱ्यात शूटींग सुरु असताना नदीत बुडून सौरभचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सौरभच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचे रितेशने आश्वासन दिले होते. हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी रितेशने दिवाळीमध्ये सौरभच्या आईकडे त्याच्या इन्शुरन्सची रक्कम हस्तांतरित केली आहे. या मदतीनंतर ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’चे जनरल सेक्रेटरी अशोक दुबे यांनी रितेशचे आभार मानले आहेत.
“ज्या दिवशी इन्शुरन्स कंपनीने क्लेमचे पैसे पाठवले, त्याच दिवशी सौरभ शर्माच्या आईच्या अकाऊंटमध्ये पैसे हस्तांतरीत करण्यात आले. रितेशच्या या कृतीचं आम्ही कौतुक करतो. सौरभच्या कुटुंबीयांसाठी त्याने केलेल्या मदतीतून त्याची माणुसकी स्पष्टपणे दिसून येते”, असे ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’चे जनरल सेक्रेटरी अशोक दुबे त्यांनी म्हटले आहे.
साताऱ्यातील संगम माहुली परिसरात रितेशच्या चित्रपटातील गाण्याचे शूटिंग सुरू होते. या गाण्यात हळदीचे दृश्य असल्यामुळे शूटींगमध्ये सर्वांच्या अंगाला आणि कपड्यांना हळद लागली होती. त्यामुळे जवळच नदी असल्याने सर्वजण नदीवर अंघोळीसाठी गेले होते . या नदीमध्ये भोवरे होते सौरभला या गोष्टीचा अंदाज न आल्याने तो अचानक बुडायला लागला. यानंतर दोन दिवस सौरभचा शोध सुरू होता. दोन दिवसांच्या प्रयत्नांनंतर त्याचा मृतदेह सापडला होता.