
नवी दिल्ली : आशिया कप २०२५ नंतर विजेत्या भारतीय संघाला ट्रॉफी देण्यात आली नाही. ही ट्रॉफी मिळाली नाही तर आयसीसीच्या बैठकीत हा विषय मांडला जाईल, असा इशारा बीसीसीआयने एसीसी अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रातून दिला आहे. बीसीसीआयने एसीसी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना पत्राद्वारे इशारा दिला आहे की, जर भारताला विजेतेपदाची ट्रॉफी दिली गेली नाही, तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी माध्यमांना सांगितले की, जर नक्वी यांनी या प्रकरणावर सकारात्मक पावले उचलली नाहीत, तर बीसीसीआय टप्प्याटप्प्याने कारवाईची तीव्रता वाढवेल.
आशिया चषक २०२५ मध्ये २८ सप्टेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून स्पर्धा जिंकली. मात्र, विजयानंतर ट्रॉफी सादरीकरणात अनपेक्षित घडामोडी घडल्या. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पीसीबी आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे नक्वी ट्रॉफी घेऊन मंचावरून निघून गेले आणि ट्रॉफी भारताकडे सोपवली गेलीच नाही.
या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन वेळा सामना झाला आणि तिन्ही वेळा भारताने विजय मिळवला. भारताने १४ सप्टेंबर रोजी गट टप्प्यात पहिला विजय मिळवला, ज्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकड्यांशी हस्तांदोलन करण्यास टाळाटाळ केली होती.
दुसरा सामना २१ नोव्हेंबर रोजी सुपर फोर टप्प्यात झाला, ज्यात पुन्हा भारताने बाजी मारली. अंतिम सामन्यातही भारताने विजय मिळवत पाकिस्तानवर वर्चस्व सिद्ध केले. हे सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आले. आशिया कपच्या इतिहासात भारत हा सर्वाधिक वेळा (९ वेळा) विजेतेपद पटकावणारा संघ आहे.