
सध्याच्या परिस्थितीत बेस्ट उपक्रम हा व्हेंटिलेटरवर आहे. या बेस्ट उपक्रमात कार्यरत आणि सेवानिवृत्त मराठी सेवक वर्गाचे लचके तोडण्याचे कार्य गेली ३० ते ३५ वर्षे सातत्याने मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असणारे नियोजनशून्य शिवसेना उबाठाची बेस्ट समिती सर्वस्वी जबाबदार आहे आणि याचाच राग बेस्टच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत काढला. या निवडणुकीत समर्थ कामगार संघटनेचे संस्थापक नेते खासदार नारायण राणे यांच्या सूचनेनुसार बेस्ट पतपेढी निवडणुकीत समर्थ बेस्ट कामगार संघटनेच्या अथक प्रयत्नाने आमदार प्रसाद लाड यांनी घेतलेल्या पुढाकाराने बनवलेल्या सहकार समृद्धी पॅनल आणि शशांकराव पॅनलच्या सहकाऱ्यांनी २१-० असा पराभव करून ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला व शिवसेना उबाठाच्या बेस्ट कामगार सेनेला बेस्ट उपक्रमाच्या बेस्ट पतपेढीतून बाहेरचा रस्ता दाखवला. बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या प्रचारात समर्थ कामगार संघटनेचे सरचिटणीस विलास पवार यांनी विशेष मेहनत घेतली होती.
सन २०१९ ला अस्तित्वात असणाऱ्या शिवसेना (उबाठा)च्या बेस्ट समितीने बेस्ट उपक्रमाच्या अखत्यारित असलेली बसआगारे, बसस्थानके पुनर्विकास करण्याच्या नावाखाली विकासकांना देऊन त्यातून बेस्ट उपक्रमाला उत्पन्न देणारी रक्कम अजूनही बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत आलेली नाही, थकबाकीच आहे, याबाबत प्रशासन आणि तात्कालीक बेस्ट समिती उत्तर देणार की नाही, तसेच बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागाच्या मोठ्या, लहान वीज ग्राहकांची थकबाकी लाख, करोडच्या रकमेत आहे ती ही वसूल करताना बेस्ट उपक्रमाच्या नाकी नऊ येत आहेत. वरील थकबाकी जर वेळेवर वसूल झाली असती तर बेस्ट उपक्रम आर्थिक व्हेंटिलेटरवर गेला नसता आणि सेवकवर्गाची थकीत देणीही थोड्या प्रमाणात वेळेवर प्रदान करण्यात आली असती, ही वस्तुस्थिती आहे याला नियोजनशून्य उबाठाची बेस्ट समिती आणि प्रशासनातले झारितले शुक्राचार्य सर्वस्वी जबाबदार आहेत.
सद्यस्थितीत बेस्ट उपक्रमातील सेवकवर्गाला मिळणाऱ्या सानुग्रह अनुदानाच्या (बोनस) प्रश्नावर शिवसेना उबाठा यांच्या प्रतिनिधिक कामगार संघटनेने राजकारण करत सेवकवर्गाला वेठीस धरत आगारा-आगाराबाहेर निदर्शने करण्याची योजना आखली होती; परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार, समर्थ बेस्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष मंत्री नितेश राणे, मंत्री आशीष शेलार आणि आमदार प्रसाद लाड, तसेच मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी या मान्यवरांच्या पुढाकाराने दि.१६ ऑक्टोबर रोजी मुंबई महानगरपालिकेला आणि बेस्ट उपक्रमाला रुपये ३१ हजार-इतके सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर करण्यात आले, त्यामुळे शिवसेना उबाठाच्या कामगार संघटनेचा फियास्को झाला. खोटं बोल पण रेटून बोल या शिवसेना उबाठाच्या प्रवृतीला महायुतीने चपराक दिली आणि बोनस देण्याचा कामगार हिताचा निर्णय घेऊन बेस्टच्या सेवकवर्गाच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बेस्टच्या २५ ते ३० हजार सेवक वर्गाच्या घरची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे.
बेस्ट उपक्रमाच्या सेवकवर्गाकडून यासाठी मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद. देण्यात आले. मात्र यातही पालिकेने बेस्टला सानूग्रह अनुदान देताना वेगळी रक्कम न देता जी आर्थिक मदत दर वर्षासाठी करण्यात येते त्यातून कापून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; परंतु असं सध्या तरी कर्मचाऱ्यांच्या घरची दिवाळी गोड होणे महत्त्वाचे. वर्षानुवर्षे मुंबई महानगरपालिकेवर सत्ता भोगलेल्या उबाठा शिवसेनेने मुंबईत मराठी माणूस टिकावा यासाठी नेमके केले तरी काय? आज खरा मुंबईकर हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला मात्र तेच अनधिकृतरीत्या झोपडपट्ट्या बांधून राहिलेले उपरे मात्र शासनाच्या निरनिराळ्या योजनेमुळे खरे मुंबईकर झाले. मात्र खरा मुंबईकर मुंबई बाहेर गेल्यामुळे शिवसेनेची खरी वोट बँक मुंबई बाहेरून मुंबईत प्रवास करून कामावर येऊ लागली. याचा थोडाफार फटका हा शिवसेनेला बसणारच होता. मात्र त्यावेळेस हा मुंबईकर मुंबई बाहेर जाऊ नये म्हणून शिवसेनेतर्फे पद्धतशीरपणे कोणतेही प्रयत्न केले गेले नाही.
आज मुंबई महानगरपालिका बेस्ट यासारख्या संस्थांमध्ये काम करणारा कर्मचारी वर्ग हा रोज दोन ते अडीच तास लोकलमध्ये लटकून प्रवास करून मुंबईत येत आहे, मात्र दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेच्या अखंड भूखंडांवर अनधिकृत अतिक्रमणे उभी राहिली. त्याचं जर का मुंबई महानगरपालिकेच्या वसाहती उभारल्या गेल्या असत्या तर आज शिवसेनेची अखंड वोट बँक उभी राहिली असती तर दुसरीकडे बेस्टच्या सध्या मोठमोठ्या वसाहती आहेत, त्यांचे जर पद्धतशीरपणे नियोजन करून त्यांचा पुनर्विकास केला गेला असता तर आज जो ७० टक्के कर्मचारी वर्ग हा मुंबई बाहेरून वेस्ट मध्ये कामाला येत आहे तो आज मुंबईत राहून त्याने नोकरीवर कर्तव्यपूर्तता केली असती. दोन आठवड्यापूर्वी बेस्टबद्दल जो कळवळा उबाठा पक्षास आला होता तो जर त्या वेळेला असता तर आज ऊबाठा पक्षाची ही चिंताजनक अवस्था झाली नसती. त्यामुळे बेस्टच्या या सर्वस्वी अवस्थेला नेमके जबाबदार कोण आहे हे सर्वसामान्य कर्मचारी तसेच मुंबईकरांनाही ठाऊक आहे.
- अल्पेश म्हात्रे