Monday, October 20, 2025
Happy Diwali

जगभरातील वेबसाइट्स आणि अ‍ॅप्स ठप्प: AWSमध्ये बिघाड, युजर्सना मोठा फटका

जगभरातील वेबसाइट्स आणि अ‍ॅप्स ठप्प: AWSमध्ये बिघाड, युजर्सना मोठा फटका

नवी दिल्ली : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जगभरातील लाखो इंटरनेट युजर्सना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (AWS) मध्ये आलेल्या बिघाडामुळे अनेक वेबसाइट्स आणि अ‍ॅप्स अचानक बंद पडले तर काही धीम्या गतीने काम करू लागले.

Amazon, Google, Snapchat, Canva, Roblox, Fortnite, Signal, Slack, Prime Video, Tinder यांसारख्या लोकप्रिय सेवा काही काळासाठी पूर्णतः तर काही अंशतः बंद पडल्या. गेमिंग प्लॅटफॉर्म्स (Roblox, Fortnite, Clash Royale, Pokémon Go), आर्थिक अ‍ॅप्स (Coinbase, Robinhood), आणि AI चॅटबॉट्स (जसे Perplexity) यांनाही याचा मोठा फटका बसला.

ही अडचण भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजता सुरू झाली. हजारो युजर्सनी तक्रारी DownDetector वर नोंदवल्या. अनेक ठिकाणी “Server Down”, “Gateway Timeout” अशा त्रुटी दिसू लागल्या.

ही समस्या अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (AWS) च्या क्लाउड सिस्टिममध्ये तांत्रिक बिघाडामुळे उद्भवली. AWS वर हजारो अ‍ॅप्स आणि वेबसाइट्स अवलंबून आहेत. त्यामुळे, एका ठिकाणी बिघाड झाल्याने त्याचा परिणाम जागतिक स्तरावर दिसून आला.

अमेरिका, युरोप, आशिया, सर्वत्र याचा परिणाम झाला. ब्रिटनमधील Lloyds, Bank of Scotland, HMRC (कर विभाग), Vodafone आणि BT सारख्या सेवा देखील डाऊन झाल्या. फ्रान्समधील टेलिकॉम कंपन्यांनाही अडचणी आल्या.

युजर्सनी सोशल मीडियावर मीम्स आणि पोस्टद्वारे नाराजी व्यक्त केली. काही कंपन्यांनी त्यांच्या अधिकृत खात्यांद्वारे माहिती दिली की त्यांच्या टीम्स समस्या सोडवण्यासाठी काम करत आहेत.

AI प्लॅटफॉर्म Perplexity चे CEO अरविंद श्रीनिवास यांनी सांगितले की, “AWS मध्ये बिघाड झाल्यामुळे आमची सेवा बंद झाली आहे.” दरम्यान, Elon Musk यांनी या प्रकारावर प्रतिक्रिया देत AWS वर टीका केली आणि आपला मेसेजिंग प्लॅटफॉर्म "X Chat" कसा सुरक्षित आहे हे सांगितले. त्यांनी म्हटले, "X Chat हे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असून, AWS सारख्या अवलंबनांपासून मुक्त आहे."

अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसने एक अधिकृत निवेदनात सांगितले की, “आमची टीम तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी काम करत आहे. हळूहळू सेवा पुन्हा कार्यान्वित केली जात आहे, मात्र अजूनही काही ठिकाणी समस्या सुरु आहेत.”

एकाच क्लाउड प्लॅटफॉर्मवर इतक्या मोठ्या प्रमाणावर डिजिटल सेवा अवलंबून असणे हे धोकादायक ठरू शकते. AWS मधील या बिघाडामुळे संपूर्ण इंटरनेट जगतात खळबळ माजली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कंपन्यांना पर्यायी उपाययोजना करणं आवश्यक ठरणार आहे.

Comments
Add Comment