
ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांची मागणी
अलिबाग : बनावट नोटा प्रकरणातील आरोपी भूषण पतंगेच्या मृत्यूने रायगड पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्षपणे चौकशीची मागणी करीत त्यासाठी लवकरच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेणार असल्याचे ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा वंदना मोरे पत्रकार परिषदेत सांगितले.
३ ऑक्टोबर २०२५ रोजी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अलिबाग येथील भूषण पतंगेच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणी बनावट नोटा तयार करण्याचा कारखाना सापडला आणि पोलिसांनी लाखो रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. ४ ऑक्टोबरला गुन्हा दाखल करून भूषण पतंगे याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मोरे हे करीत होते. न्यायालयाने भूषण पतंगे याला पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. मात्र, चौकशीदरम्यान भूषण पतंगेची तब्येत अचानक बिघडली. त्याला प्रथम अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथील डॉक्टरांनी स्थिती गंभीर असल्याने मुंबईच्या जेजे रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मुंबईत उपचारादरम्यान, दोन दिवसांची कोठडी बाकी असतानाच भूषण पतंगेचा मृत्यू झाला. भूषण पतंगे याच्या कृत्याचे आम्ही समर्थन करीत नाही, पण चौकशीच्या फेऱ्यात असताना आरोपीचा अचानक मृत्यू होतो, ही बाब अत्यंत गंभीर आहे. पोलिसांना त्याची मेडिकल हिस्ट्री माहिती होती, मग त्यांनी मेडिकल कस्टडी न घेता, पोलिस कोठडीची मागणी का केली असा सवालही त्यांनी उपस्थित केला. वंदना मोरे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र प्रश्न उपस्थित करताना भुषणला फिट्सचा आजार होता, तर पोलिसांनी डॉक्टरांच्या देखरेखीखाली चौकशी का केली नाही? दोन दिवस कोठडी शिल्लक असताना पोलिसांनी वैद्यकीय कारणास्तव न्यायालयीन कोठडीची मागणी का केली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.