Sunday, October 19, 2025
Happy Diwali

कोकण विकासाचा ‘पर्यटन’ मार्ग

कोकण विकासाचा ‘पर्यटन’ मार्ग

महाराष्ट्राच्या विविध भागांच्या विकासाचा विषय चर्चेला येतो तेव्हा विकासावर चर्चा होताना विशेषकरून कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या चारही जिल्ह्यांमध्ये नव्याने उद्योग येण्याविषयी सुतोवाच झालं की त्याला विरोधाच निशाण फडकवलेलं असत. यामुळे औद्योगिक क्षेत्राला होणारा विरोध कोकणातील तरुणांना रोजगारापासून दूर ठेवण्यासारखे आहे. आज कोकणात आयटी कंपन्या नाही. कोकणातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले हजारो तरूण रोजगाराच्या संधी शोधत पुणे, मुंबई, नाशिक, नागपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये धाव घेताना दिसतात. यामुळे केवळ कोकणात रोजगार उपलब्ध नाही म्हणून बाहेर जाणाऱ्या या तरुणांमुळे कोकणातील गावो-गावी वयोवृद्ध आई-वडील राहतात. यात एक संधी पर्यटन व्यवसायाच्या निमित्ताने कोकणाला खुणावतेय. पर्यटन व्यवसायाला आवश्यक असणारे वातावरण दुर्दैवाने आजही कोकणात निर्माण होऊ शकले नाही.

पर्यटनासाठी कोकणामध्ये हजारो पर्यटक दरवर्षी येत आहे. कोकणामध्ये १९९७ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला. रायगड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी उद्योग उभे आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात जसा पर्यटन व्यवसायाला वाव आहे. त्याचबरोबर औद्योगिकीकरणही झालेलं आहे. पालघरमध्येही तिथल्या नैसर्गिकतेने पर्यटन वाढत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय फार मोठ्या प्रमाणावर होत आहे. कोकणच्या किनारपट्टीवर पर्यटकांची संख्या नेहमीच वाढत चालली आहे; परंतु आजही अनेक पर्यटनस्थळांवर सुखसोईंचा अभाव आहे. पर्यटनस्थळांवर सहज ये-जा करण्यासाठी रस्ते नाही. पर्यटनवाढीच्या दृष्टीने कोकणातील पर्यटनस्थळ जगाच्या पर्यटन नकाशावर येण्यासाठी तशाप्रकारे प्रयत्न झाले पाहिजे. कोकणातील पर्यटन विकासाचा शाश्वत आराखडा तयार झाला पाहिजे. पुढच्या पंचवीस-पन्नास वर्षांचं नियोजन होण्याची आवश्यकता आहे. निसर्गाने कोकणाला भरभरून दिलेलं आहे. सृष्टी सौंदर्याने नटलेलं, सजलेलं आपल कोकण आहे; परंतु कोकणातील अनेक पर्यटन स्थळ दुर्लक्षित आहेत. काही ठरावीक पर्यटनस्थळांवर पर्यटक मोठ्या संख्येने जातात; परंतु अनेक खुप सुंदर दिसणारी, असणारी पर्यटनस्थळ पर्यटनाच्या उंबरठ्यावरच उभी आहेत.

कोकणात कोणत्याही उद्योग प्रकल्पाची चर्चा सुरू झाली, की त्या प्रकल्प विरोधी समिती पहिल्यांदा तयार होते आणि प्रकल्प आपल्याकडे कसा येणार नाही याची फार पद्धतशीर काळजी विरोधी सूर आळवणारे घेतात. यामुळे गेल्याकाही वर्षात रत्नागिरी, सिंधुदुर्ग रायगड जिल्ह्यात एकही उद्योग उभारणी घेऊ शकलेला नाही. कोकणात कोणताही प्रकल्प आणताना उद्योजकही फार विचार करतात अशी स्थिती आहे. केवळ यामुळेच एकही प्रकल्प आलेला नाही. यात सर्वात दुर्दैव म्हणजे कोकणविकासाचा विषय अनेकवेळा राजकीय इश्यू म्हणून त्याचा वापर केला जातो. निवडणुका जवळपास आल्या की कोणत्याही प्रकल्पांना विरोध करणारे गळा काढणारे उठून उभे रहातात. निवडणुका झाल्या की विरोध करणारे जाग्यावर बसतात. प्रकल्पांना वारंवार विरोधच होत असल्याने प्रकल्प आणणारी कंपनी विरोध असताना जाणीवपूर्वक कशासाठी प्रकल्प उभा करण्याचा अट्टाहास करत बसणार. आजवर कोकणातील विरोधी वातावरणाने अनेक प्रकल्प कागदावरच राहिले. त्या प्रकल्पांची कोकणात प्रकल्प होणार म्हणून केवळ चर्चा झाली; परंतु पुढे काही घडले नाही.

अशा अनेक कागदावरच्या प्रकल्पांनी कागदावरच गाशा गुंडाळला. साहजिकच यामुळे कोकणात प्रकल्प नकोच अशी वातावरण निर्मिती उद्योग क्षेत्रात झाली आहे. ही बाब कोकणच्या विकासाच्यादृष्टीने फार गंभीर आहे. यामुळे कोकणात विकास प्रकल्प उभे राहूच शकले नाहीत. बर ज्यांनी-ज्यांनी आजवर कोकणात येणाऱ्या प्रकल्पांना विरोध केला त्यातल्या कुणीही आजवर एखादा उद्योग, प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत; परंतु विरोध करायला मात्र या सर्वांचाच पुढाकार असतो. कोकणातील या अशा सर्व मानसिकतेत शेवटी कोकणाला पर्यटन व्यवसायाशिवाय पर्याय नाही. कोकणातील निसर्ग सौंदर्याचा विचार करता कोकणात आणखी मोठ्या प्रमाणावर पर्यटन व्यवसाय वाढला पाहिजे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये कोकणच्या किनारपट्टीवर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या फार मोठी आहे; परंतु आज ज्या प्रमाणात पर्यटक येतात त्यापेक्षाही कितीतरी अधिक प्रमाणात पर्यटकांची संख्या वाढणे आवश्यक आहे. आज कोकणाला लागून असलेल्या गोवा राज्याची पूर्णपणे अर्थव्यवस्था ही पर्यटनावरच अवलंबून आहे. गेल्या अनेक वर्षात गोवा राज्याने पर्यटन उद्योग केंद्रस्थानी आणला आणि जगभरात पर्यटन नकाशावर गोवा राज्य आणलं गेलं. गोवा, केरळ या राज्यांच्या प्रमाणेच भौगोलिकदृष्ट्या आपलं कोकण आहे. गोवा, केरळ या राज्यांनी पर्यटनातूनच प्रगती केली आहे. कोकणालाही पर्यटनातूनच प्रगती अधिक वेगाने होऊ शकते.

राज्यसरकारने कोकणातील पर्यटनव्यवसायाला गती देणारं वेगळं धोरण आणलं पाहिजे; परंतु दुर्दैवाने कोकणातील पर्यटन व्यवसायातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळू शकते. कोकणातील पर्यटनातून राज्याची अर्थव्यवस्था अधिक मजबुत होऊ शकते. हेचमुळी राज्यकर्त्यांना कधी कळलेलं नाही. उर्वरित महाराष्ट्रातील राजकिय नेते कोकणविकासाच्या बाबतीत फार कधी अनुकूल असल्याचे चित्र पाहावयास कधी मिळाले नाही. कोकणातील आजवर पर्यटनमंत्री तर उर्वरित महाराष्ट्रातीलच राहिले आहे. पूर्वी राज्यमंत्रीमंडळानी मंत्र्यांकडे अर्धा डझन खाती असायची. त्यामुळे पर्यटनासारख्या महत्वाच्या खात्याकडे कधी कोणी फार लक्षच दिले नाही. पर्यटन मंत्र्यांना पर्यटन विकासात जर स्वारस्य असेल तरच पर्यटनस्थळांचा विकास होऊ शकेल. राज्याचा पर्यटन विभागही उपेक्षित असल्यासारखे आहे. त्यामुळे कोकणातील जिल्हाधिकारी कार्यालयातून पर्यटन विभाग असतो; परंतु पर्यटन विभागाकडे कोणत्याही योजना नाहीत की आणखी काही नाही.

त्यामुळे कोकणातील पर्यटन विकास हा त्या-त्या भागातील पर्यटन व्यवसायात असणाऱ्यांच्या स्वत:च्या प्रयत्नातून होत आहे. गोवा राज्यातूनही पर्यटक कोकणात येत आहे. रायगडचा अलिबाग, हरिहरेश्वर, रत्नागिरी, आवेरे, सिंधुदुर्गातील तारकर्ली, देवबाग अशा किनारपट्टीवरच्या पर्यटनस्थळांवर गर्दी वाढू लागली आहे. यातील काही पर्यटनस्थळांवर बऱ्यापैकी पर्यटन व्यवसाय स्थिरावला आहे. परंतु या सर्वाला ज्या मर्यादा आहेत. पर्यटन व्यवसायाशी संबंधित सर्व व्यवसाय वाढले पाहिजेत. कोकणातील पर्यटनव्यवसायाशी संबंधित असणाऱ्या सर्वांनीच एक मानसिकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. पर्यटन हा व्यवसाय आहे. या व्यवसायातून मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्मितीच्या संधी आहेत. तो प्रयत्न केलाच पाहिजे आणि कोकणातील जनतेनेही पर्यटन व्यवसायातही ज्यांना-ज्यांना ज्या प्रकारचा व्यवसाय आणि सेवा देणे शक्य आहे त्यांनी तो प्रयत्न करायला हवा तर आणि तरच पर्यटन व्यवसायाच्या संधीच सोनं कोकणातील बेरोजगार तरुणांना करता येणं शक्य आहे.

 संतोष वायंगणकर

Comments
Add Comment